चंद्रपूर : ताडोबात काळा बिबट आढळून आल्यानंतर जिल्ह्यातील कोठारीच्या जंगलात अतिशय दुर्मिळ समजल्या जाणारे ‘अल्बिनोस’ हे पांढरे हरीण आढळून आले आहे. पांढरे हरीण दुर्मिळ असून ही हरणांची एक प्रजाती आहे. ज्यामध्ये रंगद्रव्य नसते आणि पूर्णपणे पांढरी त्वचा आणि गुलाबी डोळे, नाक आणि खूर असतात. ‘पाईबाल्ड’ हरीण अधिक सामान्य आहेत. ‘अल्बिनिझम’ अत्यंत दुर्मिळ आहे आणि ३०००० पैकी फक्त एका हरणांमध्ये दिसू शकतो. पृथ्वीवर फारच कमी पांढरे हिरण आढळतात.
वन्यप्राणी अभ्यासकाच्या मते, १००० हरिणांपैकी एकामध्ये ‘अल्बिनोस’ची लक्षणे दिसू शकतात. ‘अल्बिनिझम’ अत्यंत दुर्मिळ आहे. या हरिणाची संख्या स्वीडनच्या वेस्ट वर्मलँडमध्ये ५० च्या जवळपास आहे. ईशान्य भारतातील आसाम राज्यातील काझीरंगा येथेही असेच दुर्मिळ पांढरे हरीण दिसले. या हरिणाचा पांढरा रंग पूर्णपणे अनुवांशिक असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘जीन्स’मधील बदलांमुळे हा प्रकार घडतो. या हरीण कुटुंबाची वेगळी जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – बारावी गणिताच्या पेपर फूटप्रकरणी चार शिक्षक निलंबित; शिक्षण विभागाची कारवाई
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूरच्या जंगलात आढळलेल्या पांढऱ्या हरिणाचे छायाचित्र ‘सोशल मीडिया’वर पोस्ट केले आहे. यामुळे चित्र बल्लारपूरच्या जंगलाचे आहे की, अन्य कुठले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बल्लारपूरचे माजी नगर उपाध्यक्ष पवन भगत आणि त्यांचे कुटुंबीय २ दिवसांपूर्वी कोठारी जवळील जंगलात मित्र आणि कुटुंबासह फिरत असताना त्यांना अचानक जंगलात पांढरे हरीण दिसले, असा दावा त्यांनी केला. पवन भगत यांनी जंगलात पाहिलेल्या पांढऱ्या हरिणाचे छायाचित्रही काढले आहे. ताडोबात काळ्या बिबट्यानंतर कोठारी परिसरात ‘अल्बिनोस’ आढळून आल्याने वन्यजीव अभ्यासकांमध्ये उत्साह आहे.