नागपूर: काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पर्यटकांना सुरक्षा कां नव्हती, असा सरकारला प्रश्न करताना दहशतवाद्यांना धर्म विचारायला वेळ होता काय, असे विधान केले होते. आता त्यांनी दहशतवादी आणि त्यांच्या पाठराखण करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी केली. सरकार जी कारवाई करेल त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे, असे जाहीर केले.
वडेट्टीवार म्हणाले, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य हेतू म्हणजे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून भारतातील एकात्मता भंग पाडणे आणि देशात अस्थिरता निर्माण करणे हा आहे. दहशतवादी आणि त्यांच्या पाठराखण करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. सरकार जी कारवाई करेल त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे.
भारताच्या अखंडतेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अशा देशविघातक प्रवृत्तींना मोडून काढणे अत्यावश्यक आहे. भारत एक आहे आणि एक राहील, असेही वडेट्टीवार म्हणाले. त्यापूर्वी वडेट्टीवार यांनी दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांशी बोलत बसतात का? धर्म विचारत बसतात का? असे प्रश्न केला होता. तसेच ते म्हणाले की काही पर्यटक सांगत आहेत की दहशतवाद्यांनी गोळ्या झाडण्यापूर्वी लोकांना धर्म विचारला तर काहीजण सांगतायत की असे काही घडलेच नाही.
हे लोक (सत्ताधारी) नेहमी भारत-पाकिस्तान असा जप करत असतात. त्यांनी आता सांगावं की या हल्ल्याची जबाबदारी कोणाची? हा हल्ला म्हणजे सरकारचं अपयश असल्याचं सरकारने स्वीकारावे. पहलगाममध्ये जे काही घडले, २७ जण त्या हल्ल्यात मारले गेले. पहलगाममध्ये, काश्मीर खोऱ्यात सुरक्षा व्यवस्था का नव्हती? तिथली सुरक्षा व्यवस्था का हटवली? अतिरेकी देशाची सीमा ओलांडून २०० किलोमीटरपर्यंत आत घुसले आणि आपल्या लोकांना त्यांनी मारले. हे सगळे होत असताना मोदी सरकार काय करत होते? त्यांची गुप्तचर यंत्रणा काय करत होती, असे प्रश्न त्यांनी केले होते.
काही लोक म्हणाले, दहशतवाद्यांनी धर्म विचारला, तर काहीजण म्हणत आहेत की असं काही घडलं नाही. मुळात दहशतवाद्याचा धर्म किंवा त्याची कुठलीही जात नसते, असे वडेट्टीवार म्हणाले.