नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे सप्टेंबर महिन्यात निधन झाले. त्यांच्या निधनाच्या तीन महिन्यानंतरही त्यांच्या कुटुंबीयांना भविष्य निर्वाह निधी आणि इतर आर्थिक लाभ मिळाले नाही.

 डॉ. चौधरी हे यकृताच्या आजाराने त्रस्त होते. यातच त्यांचे निधन झाले.  ते निलंबित होते. तरी त्यांना कुलगुरू पदासाठी असणाऱ्या सर्व शासकीय सुविधा लागू होत्या. त्यांच्या निधनानंतर विद्यापीठाने त्यांचे सर्व आर्थिक लाभ द्यावे अशी अपेक्षा होती. मात्र, कागदपत्रांची अडचण असल्याने लागू असलेले आर्थिक लाभ परिवाराला मिळाले नसल्याची माहिती आहे. डॉ. चौधरींच्या निधनाला तीन महिन्यांचा कालावधी लोटला. परंतु, अद्यापही त्यांच्या परिवाराला भविष्य निर्वाह निधीचेही पैसे मिळालेले नाही. यामुळे त्यांच्या परिवाराला प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यापीठाने प्रत्यक्ष लक्ष घालून त्यांच्या परिवाराला मिळणारे सर्व आर्थिक लाभ द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, चौधरींच्या परिवाराने आवश्यक काही कागदपत्रांची पूर्तता न केल्याने अडचणी येत असल्याचे विद्यापीठातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>अमरावती : धावत्‍या बसमध्‍ये काळाने गाठले! तिकीट काढतानाच महिला…

कुलगुरू चौधरी नागपूर विद्यापीठात रजू होण्यापूर्वी ते जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयात सेवेत होते. त्यामुळे चौधरींच्या सर्व सेवांचा भविष्य निर्वाह निधी एकत्र केला का? याची माहिती विद्यापीठाकडे नाही. त्यामुळेही लाभ देण्यास अडचणी येत असल्याची माहिती आहे. कुलगुरू आणि कुलसचिवांनी प्रत्यक्ष लक्ष घालून आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी परिवाराला मदत करावी अशी मागणी काही संघटनांकडून केली जात आहे.

हेही वाचा >>>अवयव दानाला बळ… मध्य भारतातील एकाच रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाचे शतक

चौधरींची कारकीर्द

डॉ. सुभाष चौधरी यांनी ८ ऑगस्ट २०२० रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांच्या नेतृत्वात विद्यापीठाने महाराष्ट्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले आणि पदव्युत्तर शैक्षणिक विभागांना स्वायत्तता प्रदान केली. ४ ऑगस्ट २०२२ ते ४ ऑगस्ट २०२४ दरम्यान विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला, ज्यात इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले. याशिवाय, १०० कोटी रुपयांच्या निधीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट कॉम्प्लेक्स आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क उभारण्यात आले. डॉ. चौधरी यांनी ‘रिचिंग टू अनरिच्ड’ अभियानाद्वारे स्थानिक रोजगार निर्मितीसाठी कार्य केले, विशेषत: नागपूर ग्रामीण, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात. खेळाच्या क्षेत्रातही त्यांनी वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांच्या मुलांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी खेलो इंडिया केंद्र सुरू करण्यास मदत केली.   

Story img Loader