गोंदिया : अपघातात वाघाचा मृत्यू झाल्यानंतर वनविभागासह संबंधित विभागाच्या प्रशासनाने दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. गोरेगाव वनविभागाने वाघांच्या संरक्षणासाठी मुरदोली मार्गालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वरील झुडपे तोडण्यासह कापणीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. लोकसत्ताने याविषयी वृत्त प्रसिद्ध करून जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले होते, हे विशेष.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१० ऑगस्ट रोजी रात्री ८:३० च्या दरम्यान कारच्या धडकेने दोन वर्षांच्या वाघाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ अर्जुनी मोरगाव-रामटेक रस्त्यावर असलेल्या गोरेगाव वनविभागाच्या मुरदोली जंगल महामार्ग रस्त्यावर घडली. या महामार्गाला लागूनच नागझिरा अभयारण्य व वनविभागाचे घनदाट जंगल आहे. अभयारण्य असल्याने या मार्गाच्या परिसरात वाघांसह दुर्मिळ वन्यप्राण्यांचा वावर नेहमीच असतो. मात्र, महामार्गामुळे वाहने भरधाव वेगाने धावतात. त्यामुळे वन्यप्राणी वाहनांच्या तावडीत येऊन त्यांचा मृत्यू होतो. आतापर्यंतच्या घटनांमध्ये पहिल्यांदाच अपघातात वाघाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान झाल्याने या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला. याची गांभीर्याने दखल घेत या मार्गावर वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी व मार्गदर्शनासाठी गतिरोधक, वेग मर्यादा फलक लावण्याच्या सूचना संबंधित विभागाने दिल्या आहेत.

हेही वाचा >>>परस्परविरोधी गटांचे काँग्रेस नेते एका व्यासपीठावर, लोकसंवाद यात्रेची आढावा बैठक उत्साहात

याशिवाय गोरेगाव वनविभागाने २२ ऑगस्टपासून रस्त्यालगतची झुडपे तोडण्याचे काम सुरू केले आहे. स्त्यावरील झुडपांची छाटणी केल्यामुळे वाहनचालकांना दुरूनच वन्यप्राणी दिसतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भविष्यात वन्यप्राण्यांचे जीव वाचणार असून वाहनचालकांनाही अपघात टाळणे शक्य होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the death of the tiger in the accident the administration of the concerned department along with the forest department started taking vigilance gondiya sar 75 amy