वाशिम : मालेगाव तालुक्यातील चिवरा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रशासनाने नव्याने चार जागांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याने जागेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत आमदार अमित झनक यांच्यासह मालेगाव तालुक्यातील नेत्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन चिवरा येथेच रुग्णालय कायम ठेवावे, अशी मागणी केली तर काही संघटनांनी सदर महाविद्यालय मानोरा येथे उभारण्याची मागणी केल्यामुळे जागेचा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
राज्य मंत्रीमंडळाने २८ जून रोजीच्या बैठकीत जिल्ह्यातील चिवरा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासोबतच ४३० खाटांचे सोईसुविधायुक्त रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. चिवरा येथील ७७ एकर ई-क्लास शेतजमिनीवर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. १०० विद्यार्थी क्षमतेचे ४८५ कोटींचा निधी खर्चून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा करून ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. परंतु यानंतर जिल्हा प्रशासनाने सदर महाविद्यालयासाठी पर्यायी चार जागांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याने संभ्रम निर्माण झाला असून मानोरा तालुक्यातील काही संघटनांनीदेखील वैद्यकीय महाविद्यालय मानोरा तालुक्यात देण्याची मागणी केली. या मागणीला जिल्ह्यातील एका राजकीय पुढाऱ्याने छुपा पाठिंबा देत या कामात खोडा घालण्याचे मनसुबे आखल्याचा आरोप होत आहे.
हेही वाचा – ॲपल कंपनीने केले चार्जिंगबाबत खबरदार, अन्यथा होईल स्फोट
४० ग्रामपंचायतीचे ठराव, झनक यांचा पुढाकार
चिवरा येथेच रुग्णालय ठेवावे, यासाठी आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे नेते दिलीपराव जाधव, मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेशराव उंडाळ, जिल्हा परिषद सदस्य सुनिल चंदनशिव, माजी सभापती सुरेशराव शिंदे, डॉ. प्रमोद नवघरे, ठाकरे गटाचे मालेगाव तालुकाध्यक्ष उद्धव गोडे, भागवत मापारी, शिरसाळा ग्रामपंचायतचे सरपंच गणेश इंगोले, जगदिश गोरे, भारत मुठाळ यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली तर ४० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी ठराव घेतले आहेत.