नागपूर : इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लावणार असे आश्वासन राज्य सरकारकडून अनेकदा देण्यात आले. मराठा समाजानेही त्यांना ओबीसींमधून आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती. यासाठी राज्यात ओबीसी समाजाच्या वतीने अनेक आंदोलने केली होती. त्यानंतर आता मराठा समाजाला धार्मिक आधारावर आरक्षण नको. मात्र आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर त्यांना ओबीसींमधून आरक्षण हवे अशी मागणी समोर येत आहे.

स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायजेशन ऑफ इंडियाच्या (एसआयओ) काही पदाधिकाऱ्यांनी लोकसत्ता कार्यालयाला भेट दिली असता विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी मुस्लीम समाजाच्या विकासासाठी आरक्षण आवश्यक आहे. हे आरक्षण ओबीसींमधून द्यावे असेही त्यांनी म्हटले.

‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता ‘एसआयओ’च्या महाराष्ट्र उत्तर विभागाचे सहसचिव तैसीर जैद, सहसचिव अबुल लैज गाझी आणि विभागीय सचिव फारीद जईम यांनी त्यांच्या संघटनेच्या विविध कामांविषयी चर्चा केली. मुस्लीम समाजाचा विकास करायचा असेल तर तरुण पिढीने उच्चशिक्षित होणे आवश्यक आहे. शिक्षणाला दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायजेशन ऑफ इंडियाच्या (एसआयओ) वतीने मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी अधिक भर दिला जातो.

आताची तरुणाई भरकटत असल्याने त्यांना आपली संस्कृती आणि परंपरांशी जोडण्यासाठीही आमची संघटना काम करत असल्याची माहिती ‘एसआयओ’च्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण द्या

सर्व समाज एकत्र यावे, सर्वांना समान अधिकार मिळावे हा संविधानाचा उद्देश आहे. मुस्लीम समाजही मागास असून त्यांना आरक्षणाची गरज आहे. आम्हाला धर्माच्या आधारावर आरक्षण नको. तशी मागणी कधीही केलेली नाही. परंतु, समाजातील आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण द्यायला हवे. तेलंगणा राज्यात ४ टक्के आरक्षण मिळाल्यामुळे येथे मुस्लीम तरुणांना चांगली संधी मिळत आहे. त्यामुळे इतर मागास प्रवर्गामधून मुस्लिमांना आरक्षण मिळायला हवे. यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून सरकारला निवेदनही देत असल्याचे तैसीर जैद म्हणाले.

मुस्लीम मुलींनी शिक्षित होणे आवश्यक

शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे. एक महिला शिकली तर संपूर्ण घराचा विकास होऊ शकतो. त्यामुळे मुस्लीम मुलींच्या शिक्षणावर आमचा भर आहे. आमची महिलांची एक चमूही यासाठी काम करते. तसेच मुलगा किंवा मुलगी असा कुठलाही भेदभाव न करता आमची संघटना सर्वांच्या शिक्षण आणि करिअरसाठी काम करते असे फारीद जईम यांनी सांगितले.

गैरसमज दूर करण्यावर भर

मुस्लीम समाज आणि तरुणांविषयी इतरांमध्ये बराच गैरसमज आहे. तो दूर करण्यासाठीही ‘एसआयओ’ काम करते असे तैसीर जैद यांनी सांगितले. समाज मिलन कार्यक्रम घेतले जातात. तसेच मशीद परिचय, इस्लामविषयी माहिती देणे, सणांमध्ये भेटवस्तू देणे असे अनेक उपक्रम राबवले जातात, असे ते म्हणाले.