नागनदीवरील पुलाचा खर्च दुपटीने वाढला
कमी दराची निविदा भरून कंत्राट मिळवायचे आणि काम सुरू केल्यानंतर तांत्रिक त्रुटी दाखवून प्रस्तावित कामाची किंमत वाढवून घ्यायची हा वर्षांनुवर्षे नागपूर महापालिकेत सुरू असलेला प्रकार आजही सुरू आहे. जुनी शुक्रवारी ते चिटणवीसपुरा दरम्यान नागनदीवरील पुलाच्या बांधकामाबाबत असाच प्रकार घडला असून, आता या पुलाच्या बांधकामाची सुमारे दुप्पट किंमत करण्यात आली आहे.
ग्रेट नाग रोड, भोला गणेश चौकातील नदीवरील जुना दुपदरी पूल पाडून नवीन चारपदरी पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी १ कोटी ४५ लाख रुपयांचे कार्यादेश देण्यात आले. नवीन पूल बांधून झाल्यावर जुना पाडण्यात आला आणि नंतर त्यांचा पाया कमजोर असल्याचे लक्षात आल्यानंतर कंत्राटदाराने सुधारित प्रस्ताव दिला. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाची किंमत २ कोटी ५९ लाख २४ हजार रुपयांवर पोहचली आहे. याचाच अर्थ आता १ कोटी ४१ लाख १४ हजार रुपये अधिक खर्च करावे लागणार आहे. या खर्चाला स्थायी समितीने १६ एप्रिल २०१६ ला मंजूरी देखील दिली आहे.
यासंदर्भात महापालिकेतील बांधकाम आणि निविदा प्रक्रियेतील जाणकारांकडून धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. महापालिकेतील बरीच कामे अशाच प्रकारे होत असतात. महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत तर याचे उत्तम उदाहरण आहे. या इमारतीच्या बांधकामाच्या अंदाजे किंमतीत अनेकदा वाढ करण्यात आली. भोला गणेश चौकातील पुलाच्या बांधकामबाबत देखील असे घडले आहे. कामाच्या मूळ प्रस्तावात जुन्या पुलालगत नवीन दोन पदरी पूल तयार करणे आणि त्यानंतर जुन्या पुलाचा स्लॅब पाडायचा होता. जुन्या पुलाचा पाया (फाऊंडेशन) जेकेटींग करून त्याला बळकटी आणायची आणि त्यावर नवीन डेकस्लॅब टाकून दोन पदरी पूल उभारण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार चार पदरी पूल उभारण्यासाठी नोव्हेंबर २०१२ मध्ये निविदा काढण्यात आली. निविदा प्रक्रियेनंतर मे. सुविचार कन्स्ट्रक्शन यांना १ कोटी ४५ लाखांचा कार्यादेश देण्यात आला. कंत्राटदाराने नवीन दोन पदरी पुलाचे बांधकाम पूर्ण केले आणि ते वाहतुकीसाठी खुले केले. जुन्या पुलाचा स्लॅब पाडताना कंत्राटदाराला पाया कमकुवत झाल्याचे समजले.
त्यानंतर महापालिकेने व्हीएनआयटी यांच्याकडून जुन्या पुलाच्या पायाबद्दल अभिमत मागवले. त्यांनी नवीन पूल बांधण्यात आल्यामुळे जुने ‘फाऊंडेशन रिपेअर’ करून सशक्त करणे संयुक्तिक नसल्याचे सांगितले. त्यानुसार २८ ऑगस्ट २०१५ ला पुलाच्या कामाची नवीन अंदाजित किंमत काढण्यास सांगण्यात आले. सदर काम हे मूळ कामाचाच भाग असल्याने आणि कामाला विलंब होऊ नये म्हणून नव्याने निविदा न काढता जुन्या निविदेच्या आधारावर कंत्राटदाराला काम करण्यास मंजुरी देण्यात आल्याचे स्थायी समितीने म्हटले आहे.
निविदा मंजुरीनंतर कंत्राटाची किंमत वाढवण्याचे प्रकार महापालिकेत सर्रास सुरूच
महापालिकेतील बांधकाम आणि निविदा प्रक्रियेतील जाणकारांकडून धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे.
Written by राजेश्वर ठाकरे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-04-2016 at 01:27 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the tender approval bridge construction cost become double