लोकसत्ता टीम
नागपूर : राज्यातील विविध भागात संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी केवळ चार महिन्यांत १३१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली. यानंतर आता मंदिर परिसर स्वच्छ आणि सात्त्विक राहावा यासाठी ‘मद्य-मांस मुक्त’ अभियान राबविले जाणार आहे.
त्यासाठी लढा दिला जाणार असून त्याची सुरुवात महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून केली जाणार आहे.याबाबत महासंघाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात मंदिर महासंघाचे सुनील घनवट यांनी सांगितले, की गेल्या काही वर्षात विविध चित्रपटांचे चित्रीकरण देशभरातील पौराणिक, ऐतिहासिक मंदिरांच्या परिसरात होते.
या कालावधीत मंदिरांचे पावित्र्य, मंदिरांतील वस्त्रसंहिता, तसेच मंदिर परिसरातील नियमांचे पालन होत नाही. या नियमांचे पालन होण्यासाठी विविध मंदिरांना निवेदन देऊन त्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच जिल्हा पातळीपासून ते गावपातळीपर्यंत पुजारी संपर्क अभियान राबवणार आहे. यातून मंदिर-पुजारी यांचे संघटन करण्यात येणार असल्याचे घनवट यांनी सांगितले.