नागपूर: धुतलेल्या कोळशाच्या वापराने वीजनिर्मिती संच अधिक क्षमतेने काम करत असल्याचे सांगत महानिर्मितीने कोळसा धुण्याचे काम राज्य खनिकर्म महामंडळामार्फत खासगी वाॅशरीजला दिले. परंतु, पाच महिन्यांपासून कोळसा धुतल्यावरही त्याचा उष्मांक वाढण्याऐवजी कमी झाला आहे. त्यामुळे कोळसा धुण्याच्या नाहक खर्चाने वीज महाग होत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
महानिर्मितीच्या विविध औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात वीज निर्मितीसाठी वर्षाला सुमारे ४२ दशलक्ष टन कोळशाची गरज असते. त्यापैकी सुमारे १२ दशलक्ष टन कोळसा धुतलेला तर इतर कोळसा कच्च्या स्वरूपात वापरला जातो. महानिर्मितीच्या सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित वीजनिर्मिती संचात पूर्णपणे धुतलेला तर इतर संचात गरजेनुसार धुतलेला व कच्चा कोळसा वापरला जातो. खासगी वाॅशरीजला कच्चा कोळसा धुण्यासाठी प्रति टन सुमारे १४० रुपये दिले जातात.
हेही वाचा… नायलॉन मांजाचे धागेदोरे गुजरात, उत्तर प्रदेशात
धुतलेला कोळसा वापरल्याने वीजनिर्मिती संच अधिक क्षमतेने काम करतात. त्याने वीजनिर्मितीही वाढत असल्याचा महानिर्मितीचा दावा आहे. तर कच्चा कोळसा धुतल्यावर त्याचा उष्मांक (जीसीव्ही) सुमारे ५०० तोे ६०० ने वाढणे अपेक्षित आहे. परंतु, तो कच्च्या कोळशाच्या उष्मांकाहून कमी झाल्याची धक्कादायक माहिती ‘लोकसत्ता’ला प्राप्त झालेल्या कागदपत्रातून पुढे आली आहे. महानिर्मितीने राज्य खनिकर्म महामंडळामार्फत हिंद महामिनरल, एसीबी, रुक्माईसह इतर काही खासगी कंपन्यांना कोळसा धुण्याचे काम दिले. करारानुसार, धुतलेल्या कोळशाचा उष्मांक ५०० ते ६०० ‘जीसीव्ही’ने (एकूण उष्मांक मूल्य) वाढायला हवा. परंतु, मे २०२३ ते सप्टेंबर २०२३ या पाच महिन्यात हा उष्मांक घटला आहे.
महानिर्मितीने मे २०२३ ते जुलै २०२३ दरम्यान सतत धुतलेल्या कोळशाचा उष्मांक घटत असल्याबाबत राज्य खनिकर्म महामंडळाला आधी १ नोव्हेंबर २०२३ रोजी व नंतर ११ डिसेंबर २०२३ रोजीही तक्रार दिली. परंतु, संबंधित कोल वाॅशरीजवर काहीच कारवाई झाली नाही. कोळसा धुतल्यावर त्यातील उष्मांक वाढण्याऐवजी घटत असल्याने तो धुण्याचा खर्च व्यर्थ जात असून त्याने वीज दर वाढण्यास हातभार लागत असल्याचे या क्षेत्राचे जाणकार सांगतात.
कोळशाचा उष्मांक (‘जीसीव्ही’मध्ये)
महिना | कच्चा कोळसा | धुतलेला कोळसा |
मे- २०२३ | ३९६१ | ४०७० |
जून- २०२३ | ४०३५ | ३९५० |
जुलै- २०२३ | ४०६५ | ३८५७ |
ऑगस्ट- २०२३ | ४०३२ | ३५८७ |
सप्टेंबर- २०२३ | ३९१२ | ३६९४ |
कोल वाॅशरीजने धुतलेल्या कोळशावर महानिर्मिती सतत नजर ठेवते. त्यानुसार आम्ही उष्मांक कमी झाल्याचे पत्र खनिकर्म महामंडळाला दिले आहे. सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित वीजनिर्मिती संचात धुतलेलाच कोळसा वापरला जातो. त्यामुळे धुतलेला कोळसा वापरल्याने वीज दर वाढल्याचे म्हणणे चुकीचे आहे. – राजेश पाटील, कार्यकारी संचालक (कोळसा), महानिर्मिती, मुंबई.
करारानुसार कोल वाॅशरीजमध्ये कोळसा धुतल्यावर उष्मांक वाढला नाही तर संबंधित वाॅशरीजवर कारवाई करून दंडही आकारला जातो. त्यामुळे महानिर्मितीचे यात काही आर्थिक नुकसान होत नाही. – प्रेम टेंभरे, महाव्यवस्थापक (ऑपरेशन्स), महाराष्ट्र खनिकर्म महामंडळ.