महागाई, बेरोजगारी आणि अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक होत शुक्रवारी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात काही कार्यकर्ते भेंडी, कारले, कांदे, बटाटे, टोमॅटो, वांगी आदी भाज्यांची माळ घालून तर हातात तेलाचे पिंप घेऊन महागाईच्या मुद्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.

सिलिंडर, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत झालेली भरमसाट वाढ आणि युवकांना नोकरी मिळत नसल्याबद्दल केंद्रातील मोदी सरकारविरोधी घोषणा देत काही कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले सुरक्षा कठडे पार करून जिल्हाधिकारी कार्यालायत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तेथे उपस्थित पोलिसांशी त्यांची झटापट झाली. तसेच महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने काही वेळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे एक तासाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी काँग्रेस शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, बंटी शेळके, प्रशांत धवडे, संजय महाकाळकर, नॅश अली आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतले. आंदोलनात विशाल मुत्तेमवार, ॲड. नंदा पराते, सुजाता कोंबाडे, अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, संजय महाकाळकर, गिरीश पांडव, कमलेश समर्थ, संदेश सिंगलकर, डॉ. गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, प्रवीण आगरे, दिनेश तराळे, पंकज निघोट, रिचा जैन, अशोक निखाडे, मामा ऊत, पुरुषोत्तम हजारे, योेगेश कुंचलवार, रमन पैगवार, प्रशांत धाकणे, संदीप सहारे, मनोज सांगोळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Story img Loader