नागपूर : राज्यात विविध समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात असताना राज्य शासनाकडून मात्र शासकीय भरती बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विरोधात स्पर्धा परीक्षा समन्वय समितीतर्फे शुक्रवारी पुण्यात आंदोलन करण्यात आले. तसेच राज्य शासनाने कंत्राटी भरतीचा अध्यादेश मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कंत्राटी भरतीचा जीआरही यावेळी आंदोलनकर्त्यांनी फाडला. कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करावा आणि राज्यात सुरू असलेल्या तलाठी भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून ही परीक्षा स्थगित करून नव्याने परीक्षा घ्यावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आली. यावरून आता राजकीय वातावरणही तापले आहे.
हेही वाचा – चंद्रपूर : उपोषण मंडपात काँग्रेस व भाजपा नेते एकाच वेळी दाखल, मग झाले असे की…
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी सत्तेच्या हव्यासापोटी सत्ता तर मिळवली, युवकांच्या भविष्यासाठी सरकार पारदर्शक नोकर भरती राबवणार का? असा थेट सवाल केला आहे. तर आमदार रोहित पवार यांनीही सरकारवर सडकून टीका करत आपण स्पर्धा परीक्षा समन्वय समितीसोबत असल्याची ग्वाही दिली.
हेही वाचा – काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी केले भाजपाचे अहिर यांचे अभिनंदन, कारण जाणून घ्या…
कंत्राटी भरती, पेपरफुटी, परीक्षा फी हे विषय अतिशय गंभीर असतानाही सरकार मात्र दुर्लक्ष करत आहे. युवा वर्गाला गृहीत धरणाऱ्या या मस्तवाल सरकारला आपण सर्व रस्त्यावर उतरल्याशिवाय जाग येणार नाही. तुमचा भाऊ आणि मित्र म्हणून हे विषय सोडवण्यासाठी मी सदैव तुमच्यासोबत आहे. तुम्ही सांगा आंदोलन केव्हा आणि कुठे करायचे, मी येईल तुमच्यासोबत, असे रोहित पवार म्हणाले.