-राजेश्वर ठाकरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अग्निपथ’ योजनेबद्दल लष्करातील निवृत्त अधिकाऱ्यांमध्ये मतभेद दिसून येत आहे. ही योजना चांगली असून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. काहींनी हा नियमित रोजगार नसल्यामुळे ‘अग्निवीरां’मध्ये सैन्यदलाबाबत बांधिलकी नसेल, असे म्हटले आहे.
एअर व्हाईस मार्शल विजयकुमार वानखडे (निवृत्त) यांनी सरकारने उचलेले पाऊल योग्य असल्याचे म्हटले आहे.

‘अग्निपथ’ योजनेत २५ टक्के सैनिकांना परत सेवेत घेतले जाणार आहे तर ७५ टक्के सैनिक सैनिकांना कर्तव्यातून मुक्त केले जाईल. जे ७५ टक्के तरुण बाहेर पडतील त्यांच्या जागेवर नवीन तरुणांना संधी मिळेल. या योजनेमुळे चार वर्षांकरिता का होईना बऱ्याच मुलांना रोजगार मिळेल, असेही वानखडे म्हणाले.

दरम्यान, सशस्त्र दलात अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देणारे लेफ्टनंट कर्नल महेश देशपांडे (निवृत्त) यांनी मात्र सरकारने अशाप्रकारे लष्करात प्रयोग करू नये, असे म्हटले आहे. या योजनेनुसार तरुणांना चार वर्षानंतर सेवामुक्त केले जाईल. त्यानंतर या युवकांच्या पुढे मोठे आयुष्य असेल. त्यांना देण्यासाठी सरकारकडे नोकरी आहेत का, असा सवाल त्यांनी केला.

अल्प कालावधीसाठी सेवा करायची असल्याने त्यात कटिबद्धता राहणार नाही. संरक्षण दलात समर्पण, बांधिलकी खूप महत्त्वाची आहे, ती अग्निवीरांमध्ये असेल, याची शाश्वती नाही. एका वर्षांत तीन महिन्यांच्या सुट्या असतात. चार वर्षांत १२ महिने सुटीत जातील. तेव्हा ही योजना फार उपयोगी ठरेल, असे वाटत नाही, असेही देशपांडे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agneepath scheme ex service men have different opinions on issue scsg