लोकसत्ता टीम
अमरावती : बुलढाणा जिल्ह्यात प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या सहा कृषी सहायकांना मुळ कार्यालयात परत आणा, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील ३२८ कृषी सहायकांनी आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारपासून सर्व कृषी सहायक सामूहिक रजेवर गेल्याने कृषी विभागाचे बहुतांश कामकाज प्रभावित झाले आहे. रब्बी हंगामाच्या सुरूवातीलाच कृषी सहायकांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दर्यापूर तालुक्यात वैयक्तिक लाभाच्या योजनेचे लक्ष्यांक पूर्ण न झाल्याने सहा कृषी सहायकांना शिक्षा म्हणून बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या अमरावती जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष गजेंद्र मोहोड यांच्या नेतृत्वात विभागीय कृषी सहसंचालकांची भेट घेतली. त्यावेळी या कृषी सहायकांना एक महिन्यात परत बोलावू, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात टाळाटाळ केल्या जात असल्याचा आरोप संघटनेनी केला आहे.
आणखी वाचा-नागपूर : हत्याकांडातील आरोपीचा ‘लॉकअप’मध्ये आत्महत्येचा प्रयत्न
संघटनेने गेल्या २६ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केले आहे. त्यातच मंगळवारपासून जिल्ह्यातील सर्व कृषी सहाय्यक सामूहिक रजेवर गेल्याने कृषी विभागाचे कामकाज प्रभावित झाले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.