अकोला : ‘ॲग्रोशुअर’ या नावाने कृषी अवजारांच्या उत्पादनात नावीन्यपूर्ण प्रयोग करून शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कृषी अवजारे उत्पादन करणाऱ्या अकोल्याच्या अक्षय वैराळे व अक्षय कवळे या दोन विद्यार्थ्यांच्या ‘स्टार्टअप’ला नुकताच युनायटेड नेशन डेव्हलेपमेंट प्रोग्राम, अटल इनोव्हेशन मिशन व नीती आयोग आयोजित ‘युथ को-लॅब’ स्पर्धेत पुरस्कार मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ॲग्रोशुअर प्रॉडक्टस ॲण्ड इनोव्हेशनचे अक्षय वैराळे आणि अक्षय कवळे या दोन तरुण उद्योजकांनी तीन वर्षांपूर्वी हा उद्योग लहान स्तरावर सुरू केला. हे दोघेही तरुण मेकॅनिकल इंजिनिअर असून निर्मिती व विपणन या दोन्ही बाजू हे दोघे उद्योजक सांभाळतात. या उद्योगातून ते नऊजणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देतात.

हेही वाचा – वर्धा : चारशे किलो गांजा जाळला, अमली पदार्थ विरोधी दिनी पोलिसांकडून जनजागृती

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडतील असे ट्रॅक्टर व पॉवर विडरचलित जोडणी अवजारे बनवितात. त्यांच्या अवजारांमुळे शेतकऱ्यांना कोळपणी, निंदणी, फवारणी, पेरणी, मशागतीची कामे इ. यंत्रचलित करता येतात. त्यामुळे मजुरीच्या खर्चात बचत होते. शिवाय ही यंत्रे स्वतः शेतकरी, कुटुंबातील महिला असे कुणीही चालवू, हाताळू शकतात. त्यांच्या याच श्रेणीतील कोळपणी व फवारणी यंत्र या यंत्राच्या स्टार्टअपला युनायटेड नेशन डेव्हलेपमेंट प्रोग्रॅम व निती आयोग आयोजित ‘युथ को-लॅब’ स्पर्धेतील ‘लैंगिक समानता व महिला आर्थिक सक्षमीकरण’, या गटातील पुरस्कार मिळाला आहे. नवी दिल्ली येथे युनायटेड नेशन डेव्हलेपमेंट प्रोग्रॅमच्या भारतातील प्रतिनिधी शोको नोडा व अटल इनोव्हेशन मिशनचे प्रकल्प प्रमुख डॉ. चिंतन वैष्णव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना २ लाख ४० हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला असून या स्पर्धेसाठी आलेल्या ३७८ ‘स्टार्टअप्स’मधून अंतिम १२ ‘स्टार्टअप्स’ची निवड झाली.

हेही वाचा – नागपूर : मावशीने लोटले मुलीला देहव्यापारात

या दोन अभियंत्यांनी सन २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य नाविन्यता परिषद अंतर्गत पाच लक्ष रुपयांचे अनुदान सोयाबीन व हरभरा कापणी यंत्रासाठी दिले होते. त्यातून त्यांच्या स्टार्टअपची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांना आयआयटी कानपूरकडून पॉवर विडर चलित विविध नावीन्यपूर्ण अवजारांसाठी १० लाख रुपयांचे अनुदान मिळाले होते. त्यांना मुंबई येथील वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचा आधुनिक कृषी यंत्र निर्मिती पुरस्कारही मिळाला आहे. सध्या त्यांना गुरुग्राम येथे ३ व ४ जुलै रोजी होत असलेल्या जी २० परिषदेत त्यांची उत्पादने प्रदर्शनात मांडण्याची संधीही मिळाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agricultural tools industry set up after leaving the job national award for the startup of two young engineers from akola ppd 88 ssb