* रस्त्यांच्या विस्तारीकरणाचे जाळे * विद्यार्थी संघटनेचा आंदोलनाचा पवित्रा * ब्रिटिशकालीन खाणाखुणा लोप पावणार
प्रतिनिधी, नागपूर
शहरातील विस्तीर्ण केल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या जाळयात ब्रिटिशकालीन महाराजबागेसोबतच कृषी महाविद्यालयालासुद्धा धक्का पोहोचणार आहे. महाराजबागेवर गंडांतर येणार हे निश्चित होते, पण कृषी महाविद्यालयाच्या शतकपूर्तीची ओळख विस्तारित रस्त्यांच्या जाळयात मिटली जाणार आहे. महाराजबागेच्या संरक्षणासाठी नागरिक पुढे सरसावले असताना शतकपूर्तीच्या या स्तंभाला विद्यार्थ्यांनी संरक्षण कवच दिले आहे. मात्र, महापालिकेने हे संरक्षण कवच भेदण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे ब्रिटिशकालीन खाणाखुणा वाचवण्यात नागरिक आणि विद्यार्थ्यांचे संरक्षण कवच यशस्वी ठरेल का, हे कळायला मार्ग नाही.
कृषी महाविद्यालयात कृषीविद्या विभागापासून यावे लागते आणि या मार्गावर वाहतूक अतिशय मोठय़ा प्रमाणावर असल्याने त्याचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. दुचाकी तसेच चारचाकी आणि मोठी वाहनेसुद्धा या मार्गावर अतिशय वेगाने येतात. वळणमार्ग असल्याने बरेचदा समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अलीकडेच जवसशास्त्रज्ञ मानापुरे यांना या मार्गावर गंभीर अपघात झाला. गेल्या दहा वर्षांत वनशेती प्रकल्पातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. इल्लोरकर तसेच त्यांच्या कार्यालयातील लिपीक, कीटकशास्त्र विभागाचे प्रा. राम गावंडे, महाविद्यालयीन लिपीक वैद्यवार आणि विद्यार्थी या मार्गावर अपघातात जखमी झाले आहेत. त्यामुळे कृषीविद्या विभाग ते महाराजबागेपर्यंतचा रस्ता सामान्य वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा, अशी मागणी यापूर्वीही विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र, ही मागणी मान्य करण्याऐवजी या रस्त्यांचे जाळे विस्तारले जाणार असल्याचे कळताच विद्यार्थ्यांनी विरोधाचा पवित्रा घेतला आहे.
कृषी महाविद्यालयाच्या शतकपूर्तीनिमित्त महाविद्यालयाच्या आवारातील लॉनमध्ये स्तंभ उभारण्यात आला आहे. तसेच १०० वषार्ंहून जुनी झाडे या ठिकाणी आहेत. त्यांचाही बळी रस्त्यांच्या या विस्तारित जाळयात जाणार आहे. एकूणच ब्रिटिशकालीन खाणाखुणांची त्यात वाताहत होणार आहे. त्यासोबतच प्रात्यक्षिकासाठी असलेली शेती, विद्यार्थ्यांचे वसतिगृह यावरही विस्तारित रस्त्यांचे ‘बुलडोजर’ चालणार आहे. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी विद्यार्थी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. विद्यापीठाने यापूर्वीच भोले पेट्रोल पंपाजवळची जागा दिलेली असताना आणखी किती जागा त्यासाठी देणार, असा प्रश्न या संघटनेने उपस्थित केला आहे.
कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास खर्चे यांच्यासह डॉ. पंजाबराव देशमृख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू तसेच रस्ते वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांनाही यासंबंधीचे पत्र दिले आहे. यासंदर्भात डॉ. खर्चे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

Story img Loader