राज्यात अडीच वर्षे सत्तेची मलई खाण्यात व्यस्त असलेल्यांना त्यावेळी बाळासाहेबांची आठवण झाली नाही. बाळासाहेबांचे तैलचित्र विधानभवनात लावू, असे ज्यांना सुचले नाही, त्यांना आता बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे तैलचित्र विधानसभेत लावणाऱ्यांवर बोलण्याचा अधिकार नाही, असा टोला राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला.
हेही वाचा- नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चौधरींकडून राज्यपालांच्या आदेशाची अवहेलना!
विधानभवनात गद्दारांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार असल्याची टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली होती. सत्तार यांनी गोंदियात एका सामूहिक विवाह समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आले असता या टीकेला प्रत्युत्तर दिले. सत्तेत असताना तुम्हाला बाळासाहेबांची आठवण झाली नाही पण त्यांचे खरे निष्ठावंत अनुयायी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला त्यांचे मी व आमच्या मंत्रिमंडळाने मनापासून स्वागत केले. मुख्यमंत्री शिंदेंनी बाळासाहेबांचे तैलचित्र लावले म्हणून त्यांना पोटसूळ उठला आहे, असे सत्तार म्हणाले. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या हक्काबाबतचा निर्णय निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना कार्यकाळ संपल्यामुळे पक्षप्रमुख पदावर राहता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा- उपराजधानीत काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान
विधान परिषद निवडणुकीची आचार संहिता लागू असल्यामुळे धानाचे बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करता आले नाही. मात्र, आचारसंहिता संपल्यावर बोनसची रक्कम मिळेल, असे कृषिमंत्री सत्तार यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी माजी आमदार गोपालदास अग्रवाल उपस्थित होते.