नागपूर: नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यात शालेय अभ्यासक्रमात व्यापक बदल केले जात आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा कृषी विषय आहे. यामुळे शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान मुलांना लहानपणापासून दिले जाणार आहे. मुलांना शेतीचे ज्ञान झाल्यास ते व्यावहारिक शेती करू शकतात. यामुळे राज्यात पहिलीपासून कृषी विषय अभ्यासक्रमात शिकवण्यात येणार आहे.
कृषी विषयासाठी नवीन मसुदा तयार झाला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात कृषी विषय असणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना दिली.
मुलांना मातृभाषेतून म्हणजेच मराठीमधून चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. शालेय शिक्षणात शेती अभ्यास शिकवण्यात येणार आहे. राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रिकरणाचा विचार असला तरी शाळा बंद करण्याचा सरकारचा विचार नाही. महाराष्ट्रातला एकही शिक्षक बेरोजगार होणार नाही. ‘माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान मुख्यमंत्र्यांनी सुरु केले असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.
जगाला मॅन पॉवर पुरवण्याची क्षमता महाराष्ट्रामध्ये आहे. जगात स्किल डेव्हलपमेंटसाठी मुले पाहिजेत. आपण आपल्या अभ्यासक्रमात कौशल्य विकासावरच भर देत आहोत. मुलांना ज्ञान आणि रोजगार मिळावा, हा उद्देश ठेऊन अभ्यासक्रम करत आहोत असेही ते म्हणाले.