नागपूर : दोन वर्षाच्या कालावधीनंतर ॲग्रोव्हीजनच्यावतीने मध्य भारतातील सर्वात मोठे ॲग्रोव्हीजन कृषी प्रदर्शन यावर्षी २५ ते २८ नोव्हेंबर या काळात प्रथमच दाभा परिसरातील पीडीकेव्ही मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने चार दिवस कृषी क्षेत्रातील पंढरी अवतरणार आहे. यावेळी कृषी प्रदर्शनात शेतीविषयक बाबींवर आधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ॲग्रोव्हीजनच्या कृषी प्रदर्शनाची माहिती देताना नितीन गडकरी म्हणाले, यावेळी दूध, कापूस, सोयाबीन, ऊस या विषयावर विविध कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करुन या सर्व कार्यशाळा मात्र सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात याव्या. यावर्षी कृषी प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञानावर जास्तीत जास्त भर द्यावा, अशी सूचना गडकरी यांनी अग्रोव्हीजनच्या संचालकांना केली. कृषी तंत्रज्ञान, प्रशिक्षणाचे केंद्र स्थान ठरणाऱ्या कार्यशाळा, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञान सादरीकरणाची दालने, कृषीविषयक ताज्या विषयावरील कार्यशाळा, विदर्भाच्या शेती उद्योगाला नवीन दिशा देणाऱ्या परिषदासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारे दालन या प्रदर्शनात असणार आहे.

हेही वाचा >>> नागपूर : खळबळजनक, अज्ञात आरोपींनी चक्क पोलिसांची वाहने जाळली

यावेळी ॲग्रोव्हीजनमध्ये विदर्भातील शेतीमत्स्य व्यवसायावर परिषद राहणार आहे. तसेच बांबू उत्पादनातून उत्पन्नाच्या संधी या विषयावर दुसरी परिषद होणार आहे. शेतकऱ्यांच्या अधिक उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, धोरणात्मक बदलाचा पाया घालण्यासाठी या परिषदांचे आयोजन केले जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. यावेळच्या कृषी प्रदर्शनात राष्ट्रीय व आंतरराषष्ट्रीय पातळीवरील कृषीविषयक दालन राहणार आहे. कृषी व बिगर कृषी विद्यापीठातील विद्यार्थी, शेतकरी संशोधक नवउद्योजक व्यक्तींना आपली शेती व शेतकरीविषयक इनोव्हेशन व स्टार्टअप बिझनेस मॉडेल या प्रदर्शनात मांडण्यासाठी संधी आहे. शिवाय महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शेती व शेतीविषयक विविध माहिती व्हावी व त्यांचा कल वाढावा या दृष्टीने १८ ते २५ या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कृषी मंथन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय दरवर्षीप्रमाणे २०२२ मध्ये शेतीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. ज्यांना या कृषी प्रदर्शनात आवड आहे त्यांनी यात सहभागी व्हावे असेही आवाहन त्यांनी केले .

विदर्भाच्या डेअरी उद्योगाला चालना देण्यासाठी विदर्भातील दूध व्यवसायाच्या संधी या विषयावर एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय विदर्भातील शेतमाल निर्यातीच्या संधी व गोड्यापाण्यातील मत्स्यशेतीच्या संधी या विषयावरही परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत.