अमरावती : निवडणुकीची तारीख जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. बडनेराचे आमदार रवी राणा यांच्‍या मतदारसंघात भाजपचे इच्‍छूक उमेदवार तुषार भारतीय यांनी तंबू ठोकलेला असताना त्‍यांच्‍या अडचणी वाढल्‍या आहेत. त्‍यातच ऐन निवडणुकीच्‍या तोंडावर रवी राणांना धक्‍का बसला असून एका विश्‍वासू सहकाऱ्याने त्‍यांची साथ सोडण्‍याचा निर्णय घेतला आहे.

युवा स्‍वाभिमान पक्षाचे माजी जिल्‍हाध्‍यक्ष आणि मुख्‍य प्रवक्‍ते जितू दुधाने यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. जितू दुधाने हे रवी राणा यांचे विश्‍वासू सहकारी मानले जातात. त्‍यांचा राजीनामा युवा स्‍वामिभान पक्षासाठी मोठा हादरा मानला जात आहे.

हे ही वाचा…अमरावती : रवी राणा व तुषार भारतीय यांच्‍यात जुंपली, काय आहे कारण…

जितू दुधाने यांनी आपला राजीनामा पक्षाचे संस्‍थापक अध्‍यक्ष रवी राणा यांना पाठविला आहे. युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या स्‍थापनेच्‍या पुर्वीपासून मी गेली १७ वर्षे सातत्‍याने आणि अत्‍यंत समर्पित भावनेने आपल्‍यासोबत अहोरात्र कार्य करीत आलो आहे. युवा स्‍वाभिमान पक्षाची स्‍थापना झाल्‍यानंतर आपण दिलेली प्रत्‍येक जबाबदारी मी पूर्ण सक्षमतेने पार पाडली.

प्रत्‍येक कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन तसेच पक्षाच्‍या सर्व आंदोलनांमध्‍ये सक्रीय सहभाग घेतला. आजपर्यंत अनेक गुन्‍हे माझ्यावर दाखल झाले, परंतु कधी मागे हटलो नाही. पक्ष वाढीसाठी जिल्‍ह्यात गावोगावी स्‍वखर्चाने फिरून अनेक शाखा तयार केल्‍या तसेच पक्षबांधणी केली, असा दावा जितू दुधाने यांनी राजीनामा पत्रात केला आहे.

२०१४ च्‍या लोकसभा निवडणुकीत युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांनी दुय्यम दर्जाची वागणूक सहन करीत आपल्‍या घरचे कार्य समजून आपल्‍या उमेदवाराच्‍या विजयासाठी जिवाचे रान केले. दुर्देवाने आपला विजय होऊ शकला नाही, याचे दु:ख आजही मनात आहे, अशा भावना जितू दुधाने यांनी व्‍यक्‍त केल्‍या आहेत.

हे ही वाचा…यवतमाळ : नुकसान न झालेल्या शेतकऱ्यांना मदत, पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

पक्षात होत आहे घुसमट

आजवर शक्‍य तितके मी सर्व काही केले, पण आता पक्षात माझी घुसमट होत आहे. त्‍यामुळे आपण माझा राजीनामा स्‍वीकारून मला सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्‍त करावे. कुणावरही दोषारोपण करणे किंवा कुणाबद्दल चुकीचे बोलणे हा माझा स्‍वभाव नाही. पक्ष सोडताना मनाला वेदना होत आहेत, असेही जितू दुधाने यांनी म्‍हटले आहे. जितू दुधाने यांनी निवडणुकीआधी पक्ष सोडण्‍याचा निर्णय घेतल्‍याने त्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाला आहे. ते कोणता झेंडा हाती घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे