संजय मोहिते
बुलढाणा: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने आता ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा पुरस्कार देण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी येत्या ३१ मे पासून करण्यात येणार असून गाम पंचायत क्षेत्रातील दोघा कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
महिला व बालविकास क्षेत्रामध्ये चांगले काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्धेशाने ही पुरस्कार योजना राबविण्यात येणार आहे. यंदा ३१ मे रोजी आलेल्या होळकर जयंतीला या पुरस्कारांचे गावपातळीवर वितरण होणार आहे. दरवर्षी जयंतीदिनी च हे पुरस्कार वितरित करण्याचे निर्देश महिला,बाल विकास विभागाने दिले आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, ५०० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हेही वाचा >>> चंद्रपूर : सासऱ्याची चाकू भोसकून हत्या करणाऱ्या जावयास आजन्म करावास; जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
पात्रता व निवड कार्यपद्धती : यासाठी इच्छुक महिला ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवासी असणे व महिला- बालविकास क्षेत्रात त्यांची किमान ३ वर्षे उल्लेखनीय कामगिरी करीत असणे आवश्यक आहे. बाल विवाह, हुंडा निर्मूलन, लिंग चिकित्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला बचत गट, आरोग्य साक्षरता ,मुलींचे शिक्षण या क्षेत्रात त्यांचा पुढाकार आवश्यक आहे. या महिलांची निवड सरपंचाच्या अध्यक्षतेखालील निवड समिती करणार आहे. त्यामध्ये ग्रामसेवक, पोलीस पाटील, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा समावेश राहणार आहे. कार्यकाळ संपलेल्या ग्राम पंचायत मध्ये प्रशासक हे समितीचे अध्यक्ष राहतील, असे स्पष्ट करण्यात आले. इच्छुक महिलांना आपला प्रस्ताव ग्रामपंचायत कडे स्वतः सादर करावयाचा आहे.