बुलढाणा : एआयसी पीकविमा कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातील ५७ हजार ७५७ शेतकऱ्यांना ७० कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे. १५ जून २०२३ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे लेखी पत्र कंपनीने दिले आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या प्रलंबित भरपाईसंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला होता. कंपनीच्या मुंबईस्थित कार्यालयाच्या २० व्या मजल्यावरून शेतकऱ्यांसह उड्या मारू, असा इशारा त्यांनी दिला होता. याची दखल घेत विमा कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातील ५७ हजार ७५७ शेतकऱ्यांना ७० कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली असून, १५ जून २०२३ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे लेखी आश्वासनाचे पत्र तुपकर यांना १२ जून रोजी दिले आहे. मात्र जोपर्यंत हे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही, तसेच उशिरा तक्रार केल्याच्या नावाखाली अपात्र केलेल्या ११ हजार शेतकऱ्यांच्या व इतर १५ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या बाबतीत कंपनी काही निर्णय घेत नाही तोवर आम्ही माघार घेणार नाही, आंदोलनाच्या भूमिकेकर आम्ही ठाम आहोत, असे तुपकर यांनी सांगितले आहे.