नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) विकास झपाट्याने होत आहे. येथे गरजू रुग्णांच्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाची संख्या वाढत आहे. लवकरच हृदय व यकृत प्रत्यारोपण सुरू करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्या तीन हजारांच्या जवळपास गेल्याने नागरिकांकडा कल एम्समध्ये उपचार घेण्याकडे असल्याचे चित्र आहे.

एम्सला मे २०२३ मध्ये पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले. त्यानंतर आजपर्यंत प्रत्यारोपणाची संख्या २७ वर पोहचली आहे. सोबत एम्सकडून हृदय आणि यकृत प्रत्यारोपणासाठीही अर्ज केला असून हृदय प्रत्यारोपणाला मंजुरीही मिळाली. यकृत प्रत्यारोपणालाही लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच हे प्रत्यारोपण होईल, असा विश्वास एम्सचे नवनियुक्त अध्यक्ष व पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा…नागपूर : हत्या केली, पिस्तूल कमरेला खोचले आणि रेल्वेने…..पुणेकर हत्याकांडातील थरार उघड….

एम्सला अस्थिमज्जा प्रत्यारोपण सुरू झाले असून आजपर्यंत ५ यशस्वी प्रत्यारोपण झाले. येथे सिकलसेलचे सेंटर फॉर एक्सिलेंसलाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच येथे या रुग्णांवर मज्जातंतू प्रत्यारोपणासह सिकलसेलशी संबंधित नवनवीन उपक्रम राबवून रुग्णांना अद्ययावत उपचाराची सोय उपलब्ध केली जाणार आहे. येथे जॉईंट रिप्लेसमेंट, हृदय शस्त्रक्रिया, पीट स्कॅन, कर्करुग्णांवर उपचारही सुरू झाले आहे. त्यासाठीचे आवश्यक अद्ययावत यंत्राचा रुग्णांना लाभ होत आहे. येथील बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण नोंदणीपासून बऱ्याच सोयी डिजिटल स्वरूपात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे भ्रमणध्वनीवर स्कॅन करून रुग्णांचा वेळही वाचत असल्याची माहिती डॉ. महात्मे यांनी दिली.

दैनिक बाह्यरुग्णसंख्या तीन हजारांवर

एम्सची दैनिक बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्या आता १ हजार ८०० ते ३ हजार रुग्णांपर्यंत पोहचली आहे. जून २०२४ पर्यंत एम्सच्या बाह्यरुग्ण विभागात तब्बल १६ लाख ८ हजार ६९५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. आंतरुग्ण विभागातही रोज १०० ते १२० रुग्णांना दाखल केले गेले. २४ जूनपर्यंत येथे तब्बल ५९ हजार २१७ रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहितीही डॉ. पी. पी. जोशी यांनी दिली.

हेही वाचा…वारकऱ्यांसाठी आनंदवार्ता…बुलढाण्यातून आषाढी वारीसाठी सव्वादोनशे बसगाड्या, खामगावातून रेल्वेही…

१४ हजारांवर शस्त्रक्रिया

एम्समध्ये २३ शल्यक्रिया गृह मंजूर असून त्यापैकी १९ सुरू झाले आहेत. येथे रोज ३५ ते ४५ गंभीर संवर्गातील शस्त्रक्रिया होतात. जून २०२४ पर्यंत येथील सगळ्याच शस्त्रक्रिया गृहात विविध पद्धतीच्या १४ हजार ३५३ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉ. विकास महात्मे यांनी दिली.

हेही वाचा…चंद्रपूर : वीजतारांच्या वादात बाप-लेकाने शेजाऱ्याचे धड केले शिरावेगळे….

चिरफाड न करता शवविच्छेदनाला मंजुरी

तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी नागपूर एम्सला पथदर्शी प्रकल्प म्हणून चिरफाड न करता शवविच्छेदन करणाऱ्या व्हर्च्युअल ऑटोप्सी पद्धतीच्या शवविच्छेदनाची घोषणा केली होती. त्याला मंजुरी मिळाली असून त्यासाठी येथे १९.२ कोटींच्या ऑटोप्सी ब्लॉकसाठीही मंजुरी मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aiims nagpur expands medical services heart and liver transplants mnb 82 psg
Show comments