नागपूर: उपराजधानीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) तिरूपतीच्या श्री व्यंकटेश्वरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल विज्ञान या संस्थेसोबत हृदय प्रत्यारोपणाबाबत सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे नागपुरातील एम्समध्ये लवकरच हृदय प्रत्यारोपण सुरू होण्याचे संकेत मिळत आहे. हे केंद्र झाल्यास मध्य भारतातील एम्स हे पहिले शासकीय ह्रदय प्रत्यारोपण केंद्र असणार आहे.
सामंजस्य करारावर एम्सकडून येथील कार्यकारी संचालक डॉ. एम. हनुमंत राव यांनी तर तिरूपतीच्या संस्थेकडून तेथील संचालक आणि कुलगुरू डॉ. आर. व्ही. कुमार यांनी स्वाक्षरी केली. एम्समध्ये नुकतेच हार्ट फेल्युअर क्लिनिक सुरू झाले आहे. या क्लिनिकमध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना एकाच ठिकाणी विविध विभागाच्या सेवा झटपट मिळतात. सोबत या रुग्णांना आहारासह इतरही आवश्यक सुविधा दिल्या जातात. तर दुसरीकडे हृदय विकासाच्या रुग्णांच्या नोंदीही होतात.
हृदय प्रत्यारोपण केंद्रासाठी हार्ट फेल्युअर क्लिनिक महत्त्वाचे आहे. त्यानंतर आता हृदय प्रत्यारोपणासाठी तिरूपतीच्या संस्थेसोबत करार झाल्याने नागपूर एम्समधील हृदयरोग तज्ज्ञांना आवश्यक प्रशिक्षणासह रुग्ण उपलब्ध झाल्यास आवश्यक तांत्रिक मदतीसह संशोधन आणि इतरही सोय करण्यासाठी तिरूपतीचे तज्ज्ञ मदत करतील. या करारासाठी एम्सचे संचालक डॉ. एम. हनुमंत राव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्यासह हृदयरोग विभागातील सगळ्याच डॉक्टर कर्मचाऱ्यांचीही भूमिका महत्त्वाची आहे.