नागपूर : विमान प्रवासदर मध्यमवर्गाच्या आवाक्यात आल्याने आणि गडकरी-फडणवीस यांच्यामुळे नागपूरला होणाऱ्या विविध कार्यक्रम, व्यावसायिक परिषद आणि इतरही उपक्रमांमुळे येथे येणाऱ्या आणि येथून जाणाऱ्या विमान प्रवाशांच्या संख्येत २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये तब्बल ६१ हजारांहून अधिक  वाढ  झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे बहुंताशवेळा शनिवार आणि रविवारी नागपुरात येत असतात. तसेच इतर दिवशीही त्यांचे कार्यक्रम येथे होतात. यानिमित्ताने व्यावसायिक, उद्योजक आणि व्यापारी नागपुरात येण्याचे प्रमाण वाढले आहे. नागपूर हे अलीकडच्या काळात राजकीय आणि विविध मोठय़ा विकास योजनांमुळे महत्त्वाचे केंद्र झाले आहे. तसेच नागपूर येथून विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांना जाणे सोयीचे ठरत असल्याने देशी-विदेशी पर्यटकांची संख्या वाढली आहे. विमानाचे तिकीटही मध्यमवर्गाच्या आवाक्यात असल्याने विमानाने प्रवासी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या तब्बल ६१ हजार ६७१ हजारांनी वाढली.

१ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत नागपुरात येणाऱ्यांची संख्या १० लाख १४ हजार १८८ एवढी होती, तर येथून वेगवेगळ्या शहरात जाणाऱ्यांची संख्या १० लाख ४७ हजार १६१ एवढी होती.

१ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपुरात येणाऱ्या प्रवाशांची संख्या १३ लाख ३७ हजार ८४० एवढी होती, तर येथून इतर शहराकडे झेपावणाऱ्या प्रवाशांची संख्या १३ लाख ३४ हजार १८० एवढी आहे. यामुळे नागपूर विमानतळाचा महसूल देखील १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ कालावधीत वाढला आहे. नागपूर विमानतळाला या कालावधीत १२० कोटी ४ लाख ११,५६९.०० महसूल प्राप्त झाला आहे.

यात २५ कोटी ९ लाख २२,४८४ रुपये विमानांच्या लँडिंगमधून, विमान पार्किंगमधून १३ लाख ४४,७५१ रुपये आणि जाहिरातून २ कोटी २७ लाख २०,१०५ रुपये उत्पन्न मिळाले, असा तपशील अभय कोलारकर यांना माहिती अधिकारात प्राप्त झाला आहे.

तीन विमानांचे इमरजन्सी लँडिंग

नागपूर विमानतळ भौगोलिकदृष्टय़ा देशाच्या मध्यभागी आहे. तसेच मुंबई आणि दिल्ली, बंगळुरू, कोलकाता विमानतळाच्या तुलनेत नागपूर विमानतळ कमी व्यस्त आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही महानगराकडे जाणाऱ्या विमानांना आपात्कालीन स्थिती उतरण्यासाठी नागपूर योग्य ठिकाणी मानले जाते. गेल्या वर्षभरात तीन विमानांचे इमरजन्सी लँडिंग नागपुरात झाले.

वर्षभरात १,२४६ विमाने उतरली

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या काळात विमानतळावर १ हजार २४६ खासगी विमाने व हेलिकॉप्टर्स उतरले आणि त्यापासून एकूण ४४ लाख २३ हजार ८५१.०० रुपये महसूल प्राप्त झाला.

Story img Loader