नीरीच्या अभ्यासातील निष्कर्ष

नागपूर : हवेतील प्रदूषणामुळे २०११च्या तुलनेत २०१८ मध्ये झालेल्या आरोग्याच्या नुकसानीत घट झाली. मात्र, त्याचवेळी प्रदूषणामुळे झालेले मृत्यू आणि आरोग्यावर झालेल्या खर्चाची किंमत अधिक आहे. नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, प्रकल्प सहाय्यक मूर्ती नायर आणि संशोधक हेमंत भेरवाणी यांनी ‘वायू प्रदूषण बातेचे मूल्यांकन : नागपूर शहराचा अभ्यास’ या विषयावरील अभ्यास पेपर  ‘मेटालियन्स २०१९’ यात प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

भारतातील वायु प्रदूषणासोबतच आरोग्यासाठी धोकादायक ठरत चाललेले घटक देशासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. प्रदूषण रोखण्याकरिता अनेक उपाययोजना आणि धोरणे आहेत, पण सुरक्षा मर्यादेच्या पलीकडे प्रदूषण वाढले आहे. सुरक्षिततेच्या मर्यादेपलीकडे उत्सर्जित झालेल्या प्रदूषकांचा पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर बराच मोठा परिणाम होत आहे. सध्या करण्यात आलेल्या अभ्यासात आरोग्याच्या जोखमीचे विश्लेषण आणि निरीक्षण करण्यात आले आहे. तसेच नागपूर शहराकरिता २०११ ते २०१८ या कालावधीकरिता वायु प्रदूषणावर आधारित दुसरी आकडेवारी आहे. अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम१०), सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड यासारख्या प्रदूषित घटकांमुळे मानवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम तसेच त्यावरील खर्चाची आकडेवारी या अभ्यासात आहे. तसेच एकूण मृत्यूदर, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीची विकृती, श्वसन रोग विकृतीकरिता प्रदूषित घटकांची एकाग्रता, सापेक्ष जोखीम या आधारे अभ्यास करण्यात आला आहे. २०११ ते २०१८ या कालावधीत आर्थिक नुकसान अंदाजे १७ हजार ४२७ दशलक्ष इतके होते. तर २०११च्या तुलनेत २०१८ मध्ये आरोग्यावर झालेल्या खर्चाच्या किंमतीत मात्र ६४ टक्केघट आढळून आली. सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईडचा जो सतत प्रवाह होता, तो कमी झाल्यामुळे हे नुकसान देखील कमी झाले आहे. शहरातील प्रदूषणात वाढ होण्यासाठी मानवनिर्मित प्रदूषित घटक कारणीभूत आहेत. जरी बऱ्याच वर्षांत आरोग्यावर झालेल्या खर्चाची किंमत कमी झाली असली तरीही मृत्यू आणि आजाराची किंमत मात्र मोठी आहे. हा अभ्यास कोणत्याही घडामोडींना लक्ष्य करीत नाही तर पर्यावरणाला ज्या गोष्टीमुळे धोका पोहोचतो आणि त्यामुळे जे नुकसान होते, त्या आर्थिक नुकसानीबाबत जागरूकता आणणे हा या अभ्यासाचा मूळ उद्देश आहे. तसेच शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुधारित उपाय वाढवण्यावर या अभ्यासात भर देण्यात आला आहे.

Story img Loader