नागपूर : नागपूर स्थित डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुत-याची उंची पाच ते सात फूट वाढवून त्यावर पुतळा उभारावा, अशी मागणी होत आहे. याबाबतचे निवेदनबमिहान इंडिया प्राधिकरणाचे संचालक आबिद रोही यांना देण्यात आले. वारंवार या विषयाचे लेखी निवेदन, चर्चा करुन सुध्दा विमानतळ प्राधिकरण या विषयाकडे गांभिर्याने लक्ष देत नाही ही नाराजी व्यक्त करण्यात आली. पुतळ्याच्या चबुत-याची उंची कमी असल्याने पुतळा दिसायला ठेंगणा भासतो.
महामानव डॉ. बाबासाहेबांचा हा अपमान होत आहे असे प्रवाशाचे म्हणणे आहे. पुतळा चबुत-या पर्यंत वृक्ष, गवत वाढलेले असून प्रशासन लक्ष देत नाही. पुतळा परिसरात पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने बगिचा कोमेजतो आहे, विमानतळ प्रवेशव्दारापासून पुतळा दिसत नाही. विशेष म्हणजे या अगोदर विमानतळ परिसरात गाजावाजा करुन उभारण्यात आलेला डॉ. बाबासाहेबांचा पुतळा विकृत होता. जनतेच्या तीव्र विरोधानंतर प्रशासनाला पुतळा बदलवावा लागला.
हेही वाचा >>> वर्धा नगर परिषदेच्या वार्षिक कर आकारणी प्रक्रियेस राज्य शासनाकडून स्थगिती
नव्याने उभारलेल्या पुतळा चबुतराची(फांऊडेशन) उंची कमी असल्याने पुतळा दिसायला बरोबर भासत नाही या बाबतच्या सूचना, निवेदन विमानतळ प्रशासनाला देण्यात आल्या. येत्या ६ डिसेंबर पर्यंत प्रशासनाने चबुत-याची उंची वाढवून डॉ. बाबासाहेबांचा सन्मान करावा, असे निवेदनात म्हटले आहे. रिपाई (आठवले) पक्षाचे विदर्भ महासचिव बाळु घरडे यांच्या उपस्थितित विमानतळ संचालक आबिद रोही यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. उंची कमी असल्याने पुतळा ठेंगणा भासतो. त्यामुळे अपमान होतो, असे सांगण्यात आले.