चंद्रपूर : शेतजमिनीचे फेरफार व कोंबडीपालन व्यवसायासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी अजयपूरच्या सरपंर श्रीमती नलिनी तलांडे यांनी दहा हजाराची मागणी केली होती. तर ग्रामसेवक विकास तेलमासरे यांनी पाच हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांनाही ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.
तक्रारदार याने काही दिवसांपूर्वी अजयपूर येथे शेती खरेदी केली आहे. या शेतजमिनीवर त्याला कुकुटपालन व्यवसाय थाटायचा आहे. यासाठी तक्रादाराने शेतजमिन फेरफार व कुकुटपालन व्यवसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळावे यासाठी ग्राम पंचायत अजयपूर येथे रितसर अर्ज केला.
या अर्जाची दखल घेत ग्रामसेवक विकास तेलमासरे यांनी ग्रामसभेत विषय ठेवला. मात्र या दोन्ही कामासाठी विकास तेलमासरे यांनी लाचेची मागणी केली. ग्रामसेवकाला पाच तर सरपंचाला दहा हजार रूपये लाच द्यावी लागेल असे स्पष्टच सांगितले. मात्र तक्रारदार लाच देण्यास तयार नव्हता. त्यामुळे संबंधित प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधिक्षक मंजूषा भोसले यांच्याकडे तक्रार दाखल केली.
प्राप्त तक्रारीच्या आधारावर सापळा रचून ग्रामसेवक विकास तेलमासरे याला पाच हजाराची लाच स्वीकारतांना ताब्यात घेतले तर सरपंच श्रीमती नलिनी तलांडे हिने दहा हजाराची मागणी पंचासमक्ष केली होती. तिलाही ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई उपअधिक्षक मंजूषा भोसले यांंच्या नेतृत्वात करण्यात आली. सरपंच व ग्राम सेवक दोघेही लाच प्रकरणात अडकल्याने खळबळ उडाली आहे.