राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह शिंदे गट आणि भाजपाच्या काही नेत्यांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधानं केली होती. त्याविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने ‘महामोर्चा’ काढण्यात आला होता. या मोर्चात लाखो लोकांनी उपस्थिती लावल्याचा दावा, महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या मोर्चाला ‘नॅनो’ मोर्चा असं संबोधलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फडणवीसांनी ‘नॅनो’ म्हटल्यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला होता. हा व्हिडीओ महाविकास आघाडीचा नसून मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचं बोललं जात आहे. यावरून आता भाजपा आणि मराठा क्रांती मोर्चाचे नेते राऊतांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा : “शिंदे, फडणवीस गृहमंत्र्यासह झालेल्या बैठकीला होते, मग…”, बेळगावातील मराठी नेत्यांच्या धरपकडीवरून अजित पवार संतप्त

या व्हिडीओबाबत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संजय राऊतांना सल्ला दिला आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, “आम्ही व्हिडीओ ट्वीट केला का? मोर्चा सर्वांनी बघितला असून, कोणाला ‘नॅनो’ म्हणू द्या अथवा नावे ठेऊद्या. आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी आम्हाला मोर्चा काढायचा होता. महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभीमान दुखावला जात असल्याने आम्ही मोर्चा काढला.”

“संजय राऊत यांनी काय व्हिडीओ ट्वीट केला याबद्दल मला माहिती नाही. मात्र, सर्वांना आवाहन आहे कोणीही काम करताना वस्तुस्थिती सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा : सीमाप्रश्नावरून अजित पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनीही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, “आधीच्या सरकारने…”

संजय राऊतांची पक्षातून हकालपट्टी करा

भाजपा नेते प्रसाद लाड यांनीही संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. प्रसाद लाड म्हणाले, “संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना सातत्याने मराठा समाज, मराठा मोर्चा, मराठा आंदोलन आणि मराठा आरक्षणाचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहे. आज संजय राऊतांनी प्रत्येक गोष्टीचे उंबरठे पार केले आहेत. कालचा महाविकास आघाडीचा ‘नॅनो’ मोर्चा किती मोठा होता? हे दाखवण्याचा प्रयत्न करताना संजय राऊतांनी मराठी मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट करण्याचं वाईट काम केलं आहे. त्यामुळे माझी तुमच्याकडे मागणी आहे, तुम्ही तत्काळ मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाची माफी मागितली पाहिजे. संपूर्ण समाजाला धारेवर धरण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांची तत्काळ शिवसेनेतून हकालपट्टी करावी, अशी आमची मागणी आहे.”

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar advise sanjay raut over tweet maratha kranti morcha say mahavikas aghadi morcha ssa