लोकसत्ता टीम

नागपूर: विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजले. या दहा दिवसात राज्याच्या विविध भागातून आलेल्या सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या बाजारपेठांचा फेरफटकाही मारला. अधिवेशनासाठी आलेले मुंबईतील कर्मचारी, अधिकारी आणि आमदारांनी येथील प्रसिद्ध संत्रा बर्फीची खरेदही जोरात केली. यात उपमुख्यमंत्री अजित पवारही मागे नव्हते. त्यांनी येथे कापड खरेदीचा आनंद घेतला. त्याचे छायाचित्र आता कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर व्हायरल केले. त्यामुळे ही बाब उघड झाली.

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात आणि त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता असतानाही अजितदादा अधिवेशनानिमित्त नागपुरात येत असे. पण खरेदी व तत्सम कारणांसाठी ते नागपूरच्या बाजारपेठांमध्ये गेल्याचे स्मरत नाही. त्यांच्या निवासस्थांनी भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांशी चर्चा करण्यातच त्यांचा वेळ जात होता. महायुतीची सत्ता असतानाही ते सभागृहातच पूर्णवेळ बसायला प्राधान्य देत होते. त्यानंतर शिल्लक वेळेत कार्यकर्ते व नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

आणखी वाचा-अभिनेते शरद पोंक्षे म्हणतात, “नाट्य संमेलन म्हणजे सरकारच्या पैशावर करण्यात आलेले केवळ गेट टू गेदर, काहीही साध्य…”

भाजपसोबत गेल्यावर व महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांचे हे पहिले नागपूर अधिवेशन होते. यावेळी त्यांचे वेगळे रुप कार्यकर्त्यांना अनुभवायला आले. त्यांनी मेट्रोतून प्रवास केला. त्यावेळी त्यांनी परिधान केलेल्या पॅन्ट, शर्ट आणि गॉगलची चांगलीच चर्चा झाली होती. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी नागपुरातील एका मोठ्या दुकानातून कपडेही खऱेदी केले. या खरेदीसाठी कारण ठरली ती कार्यकर्त्यांसोबतची बैठक. त्यात काही कार्यकर्त्यांनी त्यांना ‘तुम्ही कपडे कोठून खरेदी करता’ असे विचारले. त्यावर दादांनी कार्यकर्त्याला ‘ तुम्ही कोठून खरेदी करता” असा प्रतिसवाल केला. कार्यकर्त्यांनी लगेच तो खरेदी करीत असलेल्या दुकानाचे नाव सांगितले आणि आणि सर्वजण सिव्हील लाईन्सस्थित त्या दुकानात गेले व तेथे पसंतीचे कपडे खरेदी केले. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर, काटोल तालुका अध्यक्ष नरेश अरसड़े, सतीश शिंदे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. आता दादांचा दुकानातील फोटो व्हायरल झाल्यावर याची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Story img Loader