नागपूरमधील हिवाळी अधिवेशन २ आठवड्यांत आटोपलं आहे. विरोधी पक्षाकडून आणखी एक आठवडा अधिवशेनाची मुदत वाढण्याची मागणी केली होती. पण, २ आठवड्यांतच अधिवेशन संपलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फ्रेब्रुवारीपासून मुंबईत पार पडणार आहे. अधिवेशनानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महापुरुषांबाबतची वक्तव्ये, मंत्र्यांना पुरुवण्यात येणारी सुरक्षा आणि विविध मुद्द्यांवरून शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.
विधिमंडळाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी अजित पवारांनी संवाद साधला. “मंत्र्यांच्या हकालपट्टी करा, आमदारांना सक्त ताकीद करा, राज्यपालांना हटवा, अशा मागण्या करण्यात आल्या. पण, या गोष्टींना स्पर्श पण करण्यात आला नाही. मुख्यमंत्र्यांना मूळ शिवसेना सोडून शिंदे गट स्थापन केला. त्यातून ते अद्यापही बाहेर पडण्यास तयार नाही. जे सभागृहाचे सदस्य नाही, त्यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल विधानसभेत सांगण्याचा काय संबंध,” असे खडेबोल अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले.
“शिंदे गटातील ३० ते ३५ आमदारांना ‘वाय प्लस’ सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येत आहे. एक ‘वाय प्लस’ सुरक्षा पुरवण्यासाठी २० लाख रुपयांचा खर्च येतो. मग यांना कशासाठी ‘वाय प्लस’ सुरक्षा हवी आहे. गरज असेल त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी. मग तो सत्ताधारी पक्षातील अथवा विरोधी पक्षातील असो. भास्कर जाधव यांच्या घराबाहेर पेट्रोलचे बॉम्ब सापडले असून, त्यांच्या जीवाला धोका आहे. राजन साळवींना धोका असून, त्याबाबत उपमुख्यमत्र्यांना पत्र लिहलं आहे,” असं अजित पवारांनी म्हटलं.
“विरोधी पक्षातील अनेक जणांची सुरक्षा काढण्यात आली आहे. मात्र, सरकारमधील नेत्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे,” असा आरोपही अजित पवारांनी शिंदे सरकारवर केला आहे.