राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे अधिवेशन काळासाठी निलंबन करण्यात आल्‍यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्रमक भूमिका न घेतल्याने शरद पवार नाराज असल्‍याची चर्चा असल्‍याचा प्रश्न एका पत्रकाराने विचारताच अजित पवार चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अमरावती : नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी संयुक्त अभियान राबवा; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे निर्देश

अमरावती येथे पुरस्‍कार वितरण सोहळ्यासाठी आले असताना प्रसार माध्‍यमांशी ते बोलत होते. अजित पवार म्‍हणाले, गेली ३२ मी राजकारण-समाजकारणात वावरतो आहे. मला काय दुधखुळा समजता काय? विरोधी पक्षनेते म्हणून माझे काम मी कसे करावे, हे मला कुणी सांगण्याची गरज नाही. मला विरोधी पक्षनेतेपदावर बसवलेल्या आमदारांना माझे काम माहिती आहे, त्यामुळेच तर त्यांनी मला हे पद दिले आहे. माझ्यावर पवारसाहेब नाराज झाले, हे तुम्हाला कुणी सांगितले, पवारसाहेबांनी तुम्हाला फोन केला होता का? असे एकामागून एक सवाल करत कंड्या पिकवण्याचे काम करु नका, अशा शब्दात अजित पवार यांनी पत्रकाराला खडसावले. मी तर त्यांच्या दररोज संपर्कात असतो.

हेही वाचा >>> वाशिम: भाजप सरकार विरोधात वाशिममध्ये सर्वधर्मीय मोर्चा; महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांचा निषेध

तुमच्या ज्ञानात ही भर कुणी टाकली? तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे म्हणून काहीही प्रश्न विचारु नका, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करुन नका, असे अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडीत कुठल्‍याही प्रकारचे मतभेद नाहीत. उद्धव ठाकरे यांच्‍या नेतृत्‍वातील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. याविषयी कुणी काही बोलले असेल, तर त्‍याचा ध चा मा केला जाऊ नये. आम्‍ही महाविकास आघाडीत आहोत. उद्धव ठाकरे यांच्‍या नेतृत्‍वातील शिवसेना, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर सहकारी पक्ष मिळून सर्व पक्ष एक सक्षम विरोधी पक्ष म्‍हणून काम करीत आहोत, असे अजित पवार म्‍हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar gets angry with journalist over question regarding jayant patil suspension mma 73 zws