वाशिम : यवतमाळ वाशिम लोकसभेत महायुतीचा उमेदवार राहील, असे जाहीर वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच वाशिम येथे केले होते. त्यामुळे महायुतीकडून संभाव्य उमेदवार कोण राहील, यावरून अंदाज बांधले जात असतानाच आज वाशिम शहरात राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे भव्य दिव्य बॅनर शहरात लागले असल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता तोंडावर आली आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे गेल्या पाच टर्म पासून निवडून येत असलेल्या खासदार भावना गवळी यांच्या ऐवजी नवीन नावावर शिक्कामोर्तब होणार? यावरून तर्क वितर्क लावले जात आहेत. महायुतीतील अजित पवार गटाचे नेते जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे देखील लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी आधीपासून च यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात मोर्चे बांधणी करून भेटी गाठी वाढविल्या आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात वाशिम जिल्ह्यातील दोन तर यवतमाळ जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघ येतात. एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा गड होता. परंतू मागील २५ वर्षांपासून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी येथून निवडून येत आहेत. मात्र संभाव्य लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्यांच्या उमेदवारीचा संभ्रम दिसून येत आहे. अशी मतदार संघात चर्चा आहे.
हेही वाचा…महायुतीतील ८० टक्के जागांचा तिढा सुटला! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
अश्यातच आज वाशिम शहरात जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचे मोठं मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनर वर विकासाचा वादा, चंद्रकांत दादा,वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघ महायुतीचाच असे लिहले असून त्यावर कुठल्याही पक्षाचे चिन्ह नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र झळकत आहेत. हे बॅनर चंद्रकांत ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य पवन राऊत यांच्याकडून लावण्यात आले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर लावण्यात आलेल्या बॅनर मुळे महायु्तीकडून चंद्रकांत ठाकरे का ? यावरून जोरदार चर्चा रंगत आहेत.