लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला : ‘नियतीपुढे कुणाचेही काहीही चालत नाही,’ अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भावना आज येथे व्यक्त केली. विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष, मूर्तिजापूरचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रा. तुकाराम बिडकर यांचे गुरुवारी दुपारी अपघाती निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी अजित पवार आज अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महसूलमंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्यासाठी तुकाराम बिडकर अकोल्यातील शिवणी विमानतळावर दुचाकी वाहनाने गेले होते. विमानतळावरून परत येत असतांना शिवर गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या दुचाकीला मालवाहू वाहनाने जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील प्रा. तुकाराम बिडकर व त्यांचे सहकारी प्रा.राजदत्त मानकर यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पश्चिम विदर्भातील राजकीयसह विविध क्षेत्रावर शोककळा पसरली. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्व. तुकाराम बिडकर यांच्या कुटुंबीयांची भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार किरण सरनाईक, आमदार विक्रम काळे, आमदार अमोल मिटकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ते म्हणाले, आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. तुकाराम बिरकड हे विविध क्षेत्रांचे जाणकार व विकासासाठी कार्यशील नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने माझी व्यक्तिगत व पक्षाची मोठी हानी झाली. स्व. बिडकर यांचे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात मोठे व दिशादर्शक कार्य आहे. त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. जनसामान्यांच्या सुख – दुःखात सदैव समरस होणारे ते खरे लोकनेते होते. त्यांना सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण होती. विकासासाठी ते कायम आग्रही राहत होते.

काही महिन्यांपूर्वीच प्रा.तुकाराम बिडकर यांचा अपघात झाला होता. त्यामधून ते सावरले होते. आता पुन्हा त्यांचा अपघात झाला. त्यामध्ये त्यांचे दुर्दैवी निधन झाले. नियतीपुढे कुणाचे काहीही चालत नाही. स्व. बिडकर कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यांचा मुलगा पुण्यात विधिचे शिक्षण घेत आहे. कुटुंबीयांनी काही इच्छा व्यक्त केल्या. आम्ही स्व. तुकाराम बिडकर यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत. आवश्यक ते पूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.