अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री मुंबईतील निर्मल नगर परिसरात घडली. या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रविवारी अमरावतीत आयोजित जनसन्मान यात्रा रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी ही माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची रविवारी जनसन्मान यात्रा अमरावतीत आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी येथील संत गाडगेबाबा समाधी मंदिर प्रांगणात मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, पण मुंबईत बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आल्याने हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.
हेही वाचा – “देश अस्थिर करण्याचा प्रयत्न”, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे वक्तव्य
काँग्रेसच्या अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी अजित पवार यांच्या स्वागताची तयारी केली होती. अजित पवार यांनी अमरावती मतदारसंघासाठी भरघोस निधी दिला, त्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यासाठी १३ ऑक्टोबरला अमरावतीत आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला आमदार म्हणून उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले होते. सुलभा खोडके या अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. पण, काल सायंकाळी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून सुलभा खोडके यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याचे पत्र प्राप्त झाले. त्यानंतर मुंबईतील गोळीबाराची घटना घडली. अजित पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करीत प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे.
हेही वाचा – आमदार सुलभा खोडके काँग्रेसमधून निलंबित ; पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका
या घटनेत त्यांचे निधन झाल्याचे समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहे.
अजित पवार हे अमरावतीत आल्यानंतर राजमाता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला तसेच संत गाडगे बाबा समाधी मंदिर येथे अभिवादन करून मेळाव्याला उपस्थित राहणार होते, पण त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.