राष्ट्रवादीच्या फुटी नंतर अजित पवार यांच्यासोबत न जाता शरद पवार यांची साथ देणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या भाजपसोबतच अजित पवार यांच्या हिट लिस्ट वर आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात.३१ तारखेला नागपूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा नागपुरात महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी ते काटोल या अनिल देशमुख यांच्या विधानसभा मतदारसंघांत सभा घेणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काटोल हा अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथून ते पाच वेळा निवडून आले. यंदा २०२४ ची निवडणूक ते याच मतदारसंघातून लढणार,अशी चर्चा असतानाच त्यांचे नाव उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण – पश्चिम विधानसभा मतदार संघातील महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. असे झाले तर काटोल मध्ये कोण लढणार,अशी चर्चा सूरू झाली आहे. राष्ट्रवादीची जागा असल्याने अजित पवार गट या जागेवर दावा करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा काटोल दौरा असल्याने त्याला महत्त्व आहे. पक्ष फुटी नंतर प्रथमच अजित पवार काटोलला येत आहे.

हेही वाचा >>>शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा चर्चेत, सुरक्षा रक्षकाकडून गाडीची स्वच्छता, चित्रफित व्हायरल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा ३१ ऑगस्ट रोजी ११ वाजता  काटोल  येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधे मेळावा घेणार आहे , अशी माहिती  पक्ष निरीक्षक राजेंद्र जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष अजित पवार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. आणि महायुती सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी  काटोल विधानसभा मतदारसंघात ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता  जन सन्मान यात्रेला सुरुवात करणार आहे.  काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य मार्केट यार्डमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधणार आहेत. या संवाद संदेशाच्या निमित्ताने महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासाची माहिती  मतदारापर्यंत पोहोचण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करणार आहोत.

हेही वाचा >>>यवतमाळ नजीक बोरगाव धरणात दोन तरुण बुडाले

याशिवाय येथील तरुणांच्या रोजगारावरही संवाद साधणार आहोत, अशी माहिती निरीक्षक राजेंद्र जैन यांनी दिली. काटोल विधानसभा मतदारसंघ  अजित पवार गटांसाठी सोडावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. संभाव्य उमेदवार कोण, या प्रश्नावर राजेंद्र जैन म्हणाले की, संसदीय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे, ते अंतिम निर्णय घेतील. तरीही संभाव्य उमेदवारांबाबत विचारणा केली असता काटोल विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांमध्ये सुबोध मोहिते, सतीश शिंदे, नरेश अरसाडे आदींची नावे चर्चेत असल्याची माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय सरचिटणीस सुबोध मोहिते, नागपूर जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, सतीश शिंदे, नरेश अरसाडे, रवी वैद्य, सचिन चव्हाण, विवेक चिंचखेडे, आशीष राऊत, चंद्रशेखर कुंभारे, योगेश परबत, कुलभूषण कळंबे, निरंजन, डॉ. जन्वजल, वाळके यांच्यासह अनेक पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar meeting in katol assembly constituency on 31st august cwb 76 amy