राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या मिश्किल आणि हजरजबाबी स्वभावामुळे नेहमीच ओळखले जातात. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अजित पवारांनी केलेली भाषणं आणि सत्ताधाऱ्यांना मारलेले टोले नेहमीप्रमाणेच यंदाही चर्चेचा विषय ठरले. आज विधानसभेत भाषण करत असताना अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनाही एकाच वेळी खोचक शब्दांत टोले लगावले. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. अजित पवारांच्या टोल्यांना समोरच्या बाकांवरून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी आमदारांनीही दिलखुलास दाद दिली!
“देवेंद्रजी माझा तुमच्यावर एक आक्षेप आहे..”
मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी किंवा घोषणांच्या वेळी एकही भाजपा आमदार टाळ्या वाजवत नसल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले. “आज सत्ताधारी पक्षातले दोन आणि विरोधकांचा एक असे तीन प्रस्ताव होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा दोघांनी मिळून त्याचं उत्तर दिलं. मी बघत होतो. उपमुख्यमंत्री प्रत्येकवेळी आक्रमकपणे मुद्दा मांडतात. टाळ्या घेतात. सगळे बाकडी वाजवत असतात. देवेंद्रजी माझा तुमच्यावर एक आक्षेप आहे. मी बघितलंय. जेव्हा एकनाथ शिंदे बोलत होते, तेव्हा एकही भाजपावाला टाळी वाजवत नव्हता. तुम्ही टीव्हीवर बघा. तानाजीराव गेले, तेव्हा तर त्यांनी आमच्याच लोकांना सांगितलं की टाळ्या वाजवा”, असं अजित पवार म्हणाले.
“देवेंद्रजी, तुम्ही पाच वर्षं मुख्यमंत्री होतात.एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी, करोडोंचे प्रस्ताव आज मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सगळ्यांनी मिळून किती टाळ्या वाजवल्या हो? तुमचा तर चेहरा मी सारखा बारकाईनं बघत होतो. तुम्ही इतके अस्वस्थ होत होता. माझं तुमच्याकडेच लक्ष होतं. कारण सगळ्यात जवळ इथून तुम्हीच आहात. बाकीचे सगळे लांब आहेत”, असा टोला अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना लगावला.
दरम्यान, यावर मुख्यमंत्र्यांनी “आम्हालाही चान्स मिळणार आहे”, असं म्हणताच “तुम्हाला तर सगळा चान्स आहेच. तुम्ही विधिमंडळाचे नेतेच आहात”, असं अजित पवारांनी सांगितलं.
“मुख्यमंत्र्यांनी ठामपणे गोष्टी सांगाव्यात”
“मी गंमतीने बोलत नाही. करोडोंच्या योजना सांगत असताना मुख्यमंत्री सांगायचे, अधिकारी काम करतायत, मान्यता देणार आहोत, कालबद्ध कार्यक्रम करतोय, कृतीबद्ध आराखडा तयार करतोय, योजना आणतोय. प्रस्ताव पाठवलेत,,मी प्रत्येक बाबतीत टिपण करून घेतलंय. मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे की कोणतीही गोष्ट सांगत असताना ‘हे मी करणार’ असं सांगा ना. मान्यता वगैरे कशाला. तो तुमचा अधिकार आहे. तुम्ही कशाला सांगताय कॅबिनेटला पाठवतो वगैरे. ‘मी कॅबिनेटमध्ये करून घेणार’ असं म्हणा ना. एक मेसेज गेला पाहिजे सगळीकडे. हे महाराज उपमुख्यमंत्री असताना हे रेटून बोलतायत. तुम्ही मात्र जरा मागे मागेच येतायत”, असं अजित पवारांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.
अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला!
“माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही १३ कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात. तीन प्रस्ताव अतिशय महत्त्वाचे होते. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या बोलण्याकडे बघत असतो. कॅमेरा तुमच्याकडे असतो, तेव्हा यांचाही (देवेंद्र फडणवीस) चेहरा महाराष्ट्रासमोर असतो. कारण ते अगदी जवळ बसलेले असतात. तुम्ही जेव्हा बोलत असता, तेव्हा यांची प्रतिक्रिया काय येते ते बघून जे विचार करणारे आहेत, ते वेगळाच विचार करत असतात. तुम्ही पुढच्या वेळी बोलताना यांना तात्पुरतं या बाजूला बसवा आणि तुम्ही एकटेच तिथे बसा. म्हणजे तुमच्या एकट्याचाच चेहरा कॅमेऱ्यात जाईल”, असा मिश्किल सल्लाही अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिला.
“वैनगंगा आणि नळगंगाचं तर या महाराजांनीच…”
“वैनगंगा आणि नळगंगाचं तर या (देवेंद्र फडणवीस) महाराजांनीच लक्षवेधीच्या वेळी सांगून टाकलं. खरंतर अशा गोष्टी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसहीत बाकीच्यांनी न सांगता त्या फक्त मुख्यमंत्र्यांना शेवटच्या दिवशी जाहीर करण्यासाठी ठेवायच्या असतात. देवेंद्रजी, तुम्ही उगीच हात चोळल्यासारखं करू नका. मी बिलंदर शब्द तुमच्यासाठी वापरणार नाही. तो शब्द इथे चालणार नाही. पण तुम्ही अत्यंत हुशारीने सगळ्या गोष्टी सांगता. सगळे खुशीत असतात. असं करू नका. आम्ही अडीच वर्षं दोघं जवळ जवळ बसलो होतो. त्यामुळे मला कधीकधी फार दु:ख होतं, वेदना होतात. त्यामुळे असं करू नका”, असा खोचक टोला अजित पवारांनी भाषणाच्या शेवटी लगावला.