नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटात सामील झालेल्या नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील नेत्यांना राजकीय ताकद मिळवण्यासाठी विधान परिषदेची किमान एक जागा हवी आहे. त्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या १२ जुलै रोजी विधानपरिषदेसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. २ जुलै ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. १६ जुलैच्या आधी मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे. संख्याबळ बघता महायुती ९ जागांसाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या नेत्यांना नागपूर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढण्यासाठी विधान परिषदेची किमान एकतरी जागा हवी आहे.
राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर विदर्भातील अनेक नेते, पदाधिकारी हे अजित पवार गटात गेले. त्यात नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर व शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी महाराष्ट्राच्या उपराजधानीतून उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार प्रफुल्ल पटेल यांना साथ दिली. लोकसभेमध्ये अजित पवार यांनी विदर्भात एकही जागा न मिळवून दिल्याने विदर्भातील सर्व जिल्हा अध्यक्ष नाराज आहेत. त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यात महायुतीत राहून एक तरी जागा मिळेल की नाही, अशी शंका आहे. तसेच पक्षाच्या नेत्याचे या बाबतीत विदर्भावर दुर्लक्ष होत असल्याची स्थानिक नेत्यांची भावना आहे.
हेही वाचा…उत्तर प्रदेशात प्रश्नपत्रिका फोडल्यास आजन्म कारावास, महाराष्ट्रात असा कायदा पावसाळी अधिवेशनात…
राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटा पवारचे नागपूर जिल्हा अध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर व शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ती खदखद व्यक्त केली. त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या इच्छेचा मान राखून विधान परिषदेवर संधी मिळावी अशी मागणी केली आहे. नागपूर जिल्हा हा उपराजधानीचा जिल्हा असल्याने व संघटनात्मक विदर्भात वाढवण्याच्या दृष्टीने ही मागणी करीत असल्याचेही सांगितले.
हेही वाचा…मेट्रोला दिलेल्या भूखंडांचे भाडे पाच वर्षांसाठी माफ! एनआयटीकडून राज्य शासनाला प्रस्ताव
नागपूर जिल्हयात भाजप, काँग्रेस चे दिग्गज नेते असल्याने आपला पक्ष महायुतीत कमजोर पडायला नको व राष्ट्रवादीने सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांना स्थान दिले असा संदेश महाराष्ट्रात जावा अशी आमची इच्छा आहे. पक्षाने मुंबईत जाऊन नेत्यांच्या मागे पुढे घिरटया घालणाऱ्या लोकांना विधान परिषदेवर पाठवू नये, असेही ते म्हणाले.