Ajit Pawar On NCP MLAs : महायुतीने विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठे यश मिळवले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची व एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपूरात नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तार होणार आहे. त्यापूर्वी नागपूरातील गणेशपेठ परिसरात राष्ट्रावादीच्या (अजित पवार) विदर्भ व नागपूर विभागीय कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या (अजित पवार) आमदारांची संख्या वाढली असती पण काही कारणांमुळे ते शक्य झाले नसल्याचे म्हटले.

काय म्हणाले अजित पवार?

नागपूरातील गणेशपेठ परिसरात राष्ट्रावादीच्या (अजित पवार) विदर्भ व नागपूर विभागीय कार्यालयाचा उद्घाटन कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि राज्यातील लाडक्या बहिणींनी दाखवलेल्या प्रेमामुळे आपण ४१ आमदार निवडून आणू शकलो. आमदारांची संख्या अजूनही वाढली असती, परंतु काही गोष्टी आम्हाला ठराविक लोकांना माहित आहेत, त्या बोलून मी तुमचा वेळ घेत नाही. मला आनंद आहे की, आपण विदर्भात ७ जागा लढलो. यातील मोर्शीच्या जागेवर मैत्रिपूर्ण लढत नसती आणि ती जागा आपल्यालाच मिळाली असती तर तिथेही आपले देवेंद्र भुयार निवडून आले असते.”

बुलढाण्यात काय घडले?

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान बुलढाण्यातील विद्यमान आमदारांनी अचानक साथ सोडल्यामुळे काय झाले ते ही सांगितले. अजित पवार म्हणाले, “जेव्हा तिथले विद्यमान आमदार महायुती सरकारकडून सगळी कामे घेऊन गेले. त्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची असा प्रश्न पडला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष काजी साहेबांनी मनोज कायंदे यांचे नाव सुचवले. त्यांनी कोणाचेही न ऐकता मनोज कायंदेना तिकिट द्यायला सांगितले. जर मनोज कायंदे निवडून नाही आले तर तोंड दाखवणार नाही असे ते म्हणाले होते.”

हे ही वाचा : “लाडक्या बहिणींमुळे वाचलो, पण मेहुण्यांनी…”, अजित पवारांनी गाजवली सभा; महिलांना दिले महायुतीच्या विजयाचे श्रेय

नव्या सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार

नागपूर येथे आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. दुपारी ४ वाजता महायुतीतील सर्वच पक्षांतीन काही आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या (अजित पवार) वाट्याला दहा मंत्रिपदे आली आहेत.

Story img Loader