अकोला : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता मानापमानाचे नाट्य देखील रंगू लागले आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली. प्रचार मोहिमेत सहभागी करून घेतले जात नसल्याने अमोल मिटकरींनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपने हवेत राहू नये, असा सल्ला देखील त्यांनी दिला.
हेही वाचा >>> रामटेकमध्ये काँग्रेसला धक्का, संभाव्य उमेदवाराला नोटीस
लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू झाली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारीची माळ अनुप धोत्रे यांच्या गळ्यात टाकली. भाजपने प्रचार मोहिमेचा नाराळ देखील फोडला. महायुतीतील घटक पक्षांमध्ये मात्र समन्वयाचा अभाव दिसून येतो. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप किंवा महायुतीच्या उमेदवारांकडून आपल्याला प्रचार मोहिमेत सहभागी करून घेतले जात नसल्याचा आराेप केला आहे. ते म्हणाले, ‘महायुतीच्या उमेदवारांच वाटत नसेल की राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपल्या प्रचारासाठी यावे, तर मग मी तरी कशाला जाणार आहे? महायुतीमध्ये सन्मान दिला तर नक्की आम्ही सोबत आहोत. मात्र, अद्यापही भाजप किंवा उमेदवारांकडून कुठलेही निमंत्रण आलेले नाही. लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च असते. त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटू शकतो. त्यामुळे भाजपने हवेत राहू नये हा माझा मैत्रिपूर्ण सल्ला आहे.’ निवडणुकीच्या तोंडावर घटक पक्षाकडूनच नाराजी व्यक्त झाल्याने महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. यावर भाजप काय उत्तर देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.