बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्याचे खापर जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांच्यावर फोडत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. दुसरीकडे त्यांना अगोदरच निष्काशित करण्यात आल्याचे सांगून हे त्यांचे राजीनामा नाट्य असल्याचा पलटवार  जिल्हाध्यक्ष नाझेर काझी व त्यांच्या समर्थकानी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे यांनी या अंतर्गत वादाला तोंड फोडले. आपल्या ‘फेसबुक पेज’वर त्यांनी राजीनाम्याची पोस्ट केली आहे. राजीनाम्यावर तारीख १९ डिसेंबर  असली तरी त्यांनी आज समाज माध्यमावर राजीनामा पत्र टाकले. यामागे त्यांचा हेतू काय होता हे त्यांनाच माहित.

गेल्या ४ वर्षापासून मी निष्ठेने पक्षाचे काम केले, प्रामाणिकपणे महिला संघटनेचे काम वाढवले मात्र जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी सतत अपमानजनक वागणूक दिल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. निष्ठावान लोकांना डावलून पक्ष संघटना टिकणार नाही, जातीयवाद फोफावला तर सामान्यांना न्याय मिळणार नाही. मराठा समाजातील सक्षम महिला म्हणून अशा प्रकारे मला राजीनामा द्यावा लागणे निराशाजनक असल्याचेही अनुजा सावळे यांनी राजीनामा पत्रात नमूद केले. दरम्यान, यामुळे शांत असलेल्या अजित पवार गटात काहीसे वादळ उठले.

‘हे तर राजीनामा नाट्य’

 यासंदर्भात अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ऍड नाझेर काझी यांना विचारणा केली असता त्यांनी अनुजा सावळे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. हे आरोप साफ चुकीचे असल्याचे सांगून याउलट त्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी कामे केली. त्यांनी सिंदखेड राजा मतदासंघांचे उमेदवार मनोज कायंदे यांचा प्रचार केला नाही. महिलांचा अपमान करणे ही आपली आणि पक्षाची संस्कृती नाही. त्यांनी डिसेंबरमध्ये राजीनामा दिला आहे, आता पोस्ट टाकली. हे त्यांचे राजीनामा नाट्य असल्याचे काझी म्हणाले.

यापाठोपाठ  ज्येष्ठ नेते तुकाराम अंभोरे पाटील , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मनीष बोरकर आदि पदाधिकाऱ्यांनी या वादात उडी घेत अनुजा सावळे यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले. अंभोरे यांनी पक्षविरोधी कारवाया मुळे सावळे यांना पूर्वीच निष्काशीत करण्यात आले आहे. सिंदखेड राजा मतदार संघाच्या लढतीत त्यांनी उमेदवार मनोज कायंदे यांच्या विरोधात काम केले आहे. त्याची तक्रार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांच्याकडे तेंव्हाच करण्यात आली. त्यांना निष्काशीत सुद्धा करण्यात आल्याचे अंभोरे यांनी स्पष्ट केले आहे.

पेल्यातील वादळ

दरम्यान या वादामुळे अजितदादा गोटात वादळ निर्माण झाले असले तरी टे पेल्यातील वादळच ठरण्याची चिन्हे आहे. एकसंघ राष्ट्रवादी  ते शरद पवार गटचे आणि सध्या अजितदादा गटचे जिल्हाध्यक्ष, सिंदखेड राजा पालिकेचे अध्यक्ष असा ऍड काझी यांचा राजकीय प्रवास राहिला. त्यांना जिल्ह्यातील एकमेव आमदार मनोज कायंदे व पदाधिकाऱ्यांचे समर्थन असल्याचे सावळे यांच्या आरोप नंतर दिसून आले. यामुळे अनुजा सावळे या एकाकी पडल्याचे चित्र आहे. यामुळे (ना)राजीनामा नाट्य पेल्यातील वादळ ठरण्याची चिन्हे आहे.