राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. २० नोव्हेंबर रोजी २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर टीका टीप्पणी आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झाडल्या जात आहेत. अशातच आता रवी राणा यांनी केलेलं एक विधान सध्या चर्चेत आहे. अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तर काही फरक पडणार नाही, असं राणा म्हणाले. दरम्यान त्यांच्या यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रवी राणा यांची कानउघडणी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांनी त्यांना समज द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

अजित पवारांनी आज अमरावती दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना रवी राणा यांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, राणा म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी सारखे वागत आहेत. त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. त्यांच्या अशा बोलण्यानेच लोकसभेला त्यांच्या पत्नीचा पराभव झाला, अशी टीका अजित पवार यांनी केली.

लोक काहीही बोलत असतात, आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं. अनेकदा नकारात्मक बोललेलं मतदारांना आवडत नाही. जनता सकारात्मक विचार करत असते, मी पण विधानसभेला दोनदा रवी राणांचं समर्थन केलं. पण आता त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही आमचा उमेदवार चांगल्या मताने निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी रवी राणा यांना समज द्यावी, असा सल्लाही दिला. सोमवारी आनंदराव अडसूळही मला भेटले होते. त्यांनी सांगितलं की रवी राणा हे त्यांच्याही विरोधात काम करत आहेत. हे बरोबर नाही. याबाबत खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी योग्य शब्दात त्यांना समज दिली पाहिजे. महायुतीत कुठेही अंतर पडणार नाही, याची काळजी सर्वांची घेतली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.