कर्नाटक विधानसभेचं बेळगावात आजपासून अधिवेशन सुरु होणार आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित केलेल्या मेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसेच, कर्नाटकात कलम १४४ लागू करण्यात आलं असून, जमावबंदीचे आदेश देण्यात आलं आहेत. मराठी नेत्यांची धरपकडही करण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नागपूरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, “काही दिवसांपूर्वी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. कोणीही एकमेकांच्या राज्यात जाण्यास अडवणूक करायची नाही, असं ठरलं. पण, लोकसभेचे खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात येऊ नये म्हणून सांगितलं आहे.”
“महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर सांगायाचं समंजस्याची भूमिका घेऊ. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वांना मान्य करावा लागणार आहे. मात्र, बेळगावात मराठी लोकांची धरपकडं सुरु करायची. तिथले मुख्यमंत्री वेगळी भूमिका घेतात,” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
“गृहमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पण, गृहमंत्र्यासमोर ठरलेलं कोण मोडत आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं पाहिजे. यावर काय कारवाई केली जाणार, हे सुद्धा समजलं पाहिजे,” असं सुद्धा अजित पवारांनी म्हटलं.