नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात आघाडीतील काही वरिष्ठ नेते बोलत असतील तर माझे पण कार्यकर्ते त्यांच्या विरोधात वेगवेगळे वक्तव्य करु शकतात. मात्र जे कोणी बोलत असतील त्यांना मी फार महत्त्व देत नसल्याचे सांगत अजित पवार यांनी शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी सकाळी नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. अजित पवार यांनी नागपूरला आल्यावर त्यांनी पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली. आघाडी किंवा महाविकास आघाडीत कोण काय बोलतं यापेक्षा मी माझ्या कामाकडे लक्ष देत असतो. शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे असे विचारले असता असा नेत्यांच्या बोलण्याकडे मी फारसे त्यांना महत्त्व देत नाही. आमच्या पक्षाचे लोक त्यांच्या विरोधात बोलू शकतात असेही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >>>चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या, सोंडे; ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती’अंतर्गत विद्यार्थांना वाटप

अजुन विधानसभा निवडणुकीबाबत कुठलेही जागा वाटप झाले नाही. जिथे जिथे आमचे उमेदवार गेल्या निवडणुकीत निवडून आले होते तेथे मी जातो आहे. आज काटोल आणि नागपूरमध्ये आहे. नागपुरात लाडकी बहिण योजनेचा दुसर टप्प्याचा निधी वितरण कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमानंतर उद्या अमरावती , वरुड आणि मोर्शी मतदार संघात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचा कुणाला कुठल्या आणि किती जागा याबाबत चर्चेची एक फेरी झाली आहे. आम्ही तीनही पक्ष एकत्र महायुती म्हणून लढणार आहे. साधारणत: २८८ मतदार संघाचा विचार करून कुठल्या जागेवर कोम निवडून येऊ शकतो याबाबत एक मत करू आणि त्याप्रमाणे जागा वाटप होईल. जाहा वाटपाबाबत आमचे काही वाद नाही. जास्तीच्या जागांची मागणी करणे गैर नाही मात्र निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसोबत एकत्र बसून घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ज्यावेळी जागा निश्चित होतील त्यावेळी प्रसार माध्यमांना सांगणार आहे.

हेही वाचा >>>ऊर्जामंत्र्यांशी चर्चेनंतर कंत्राटी कामगार संघटनेचे उपोषण स्थगित

कोणी काय केले यावर मला काही बोलायचे नाही. मला माझे काम करायचे आहे. मी कामाचा माणूस आहे आणि अर्थसंकल्पातून सर्व समाजाला आणि जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे असेही पवार म्हणाले.दीक्षाभूमीला भेट देऊन भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याची एक परंपरा आहे, त्यामुळे मी अभिवादन करण्यासाठी आलो. या ठिकाणी सर्वधर्म समभाव ही विचारधारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमीला येऊन दर्शन घेत नतमस्तक होणे. त्यासाठी आम्ही सगळेजण येथे आलो आहे. दीक्षाभूमीचा जो वाद झाला आहे त्याबाबत काही बोलायचे नाही. जे खड्डे केले होते ते बुजवण्याचे काम सुरू आहे असेही अजित पवार म्हणाले. यावेळी खासदार प्रफुल पटेल, धर्मरावबाबा आत्राम उपस्थित होते.