अमरावती : उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांचा स्‍पष्‍टवक्‍तेपणा अनेक ठिकाणी दिसून येतो. गुरुवारी अमरावती दौऱ्याच्‍या वेळी प्रसार माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींना देखील त्‍याचा अनुभव आला. येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या परिसरातील नियोजन भवनात विविध विकासकामांचे उद्घाटन केल्‍यानंतर ते सभागृहातून बाहेर पडत असताना प्रसार माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींनी त्‍यांना गाठले. अजित पवार म्‍हणाले, मी कार्यक्रमात एवढा वेळ बोललो, तरीही तुम्‍हाला कळले नाही का, माझे काय विचार आहेत. काय नाहीत. केव्‍हाही आपलं दांडकं समोर करायचं?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसार माध्‍यमाच्‍या प्रतिनिधीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्‍याविषयी विचारणा केल्‍यावर अजित पवार म्‍हणाले, अरे वेड्या, ते सकाळीच ठरलेले आहे. मी इथे यायच्‍या आधीच आम्‍हाला पंतप्रधान कार्यालयातून फोन आला होता. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील फोन आला होता. पुणे येथे दुपारी ३ वाजेपासून आणखी पाऊस वाढणार, असा अंदाज वर्तवण्‍यात आला आहे. पाऊस जास्‍त पडला, तर जलमय स्थिती होते आणि ये-जा करणे अडचणीचे होते. पुणेकरांची गैरसोय होईल. ज्या भागात दौरा असेल, तेथील नागरिकांना कुठलाही त्रास होता कामा नये, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कटाक्षाने प्रयत्‍न असतो. त्‍यामुळे पंतप्रधानाचा दौरा रद्द नव्‍हे, तर स्‍थगित करण्‍यात आला आहे. परिस्थिती सामान्‍य झाल्‍यानंतर पंतप्रधान पुणे येथे येतील.
संजय राऊत यांनी महायुतीवर केलेल्‍या टीकेसंदर्भात विचारले असता, अजित पवार चिडले. म्‍हणाले, मी तुम्‍हाला एक सांगू का, मला माझ्यापुरते विचारा. रोज कोण सकाळी उठतो आणि बोलतो, त्‍यावर दररोज काय प्रतिक्रिया देणार. महायुतीच्‍या जागावाटपाची चर्चा सध्‍या सुरू आहे. पत्रकारांनी थोडा संयम बाळगावा. महायुतीचे जागा वाटपाचे ठरले, की मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी स्‍वत: पत्रकार परिषदेत घोषणा करणार आहोत.

हेही वाचा – वर्धा : जलाशयात आढळले तीन मृतदेह, दोघांची ओळख पटली; पूरबळी संख्या सात

अमरावतीच्‍या कॉंग्रेसच्‍या आमदार सुलभा खोडके या महायुतीच्‍या उमेदवार असतील का, या प्रश्‍नावर अजित पवार म्‍हणाले, महाराष्‍ट्रातील २८८ जागांपैकी महायुतीच्‍या घटक पक्षांपैकी कोणत्‍या पक्षाला कोणत्‍या जागा मिळतील, तेच आता ठरलेले नाही. एकदा जागा तर ठरू द्या.

हेही वाचा – निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले! ‘भाकप’कडून इतक्या जागांची मागणी

अजित पवार यांचे गुरुवारी सकाळी शहरात आगमन झाले. त्यांच्या हस्ते नियोजन भवन येथे अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. जीवन प्राधिकरण तपोवन – परिसर येथे अमृत-२ वाढीव पाणीपुरवठा योजना प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण यासह अन्य कामांचे भूमिपूजन त्‍यांच्‍या हस्‍ते झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar was angry with the journalists what was said in amravati mma 73 ssb