बुलढाणा : राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे नेते अजितदादा पवार हे मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे भाकितवजा विधान माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केले. हे विधान करून त्यांनी मागील काही दिवसांपासून या चर्चेमुळे राज्यात निर्माण झालेल्या वादात उडी घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार तथा बुलढाण्याचे माजी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या सिंदखेडराजा मतदारसंघातील देऊळगाव राजा येथे कृषी मेळावा पार पडला. विदर्भ मार्केटिंग फेडरेशन च्या पुढाकाराने यावेळी कृषी प्रदर्शनी देखील आयोजित करण्यात आली. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना आमदार शिंगणे यांनी वरील विधान करून धमाल उडवून दिली.
हेही वाचा >>> ओबीसींना ना लेखी आश्वासन, ना इतिवृत्त; पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या पुन्हा बैठक
यासंदर्भात विचारणा केली असता, अजितदादा एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार ही काळ्या दगडावरची रेष आहे, असे ते म्हणाले. मात्र ते कधी आणि केंव्हा मुख्यमंत्री होणार ते नक्की सांगता येणार नाही. अजितदादा नेहमी म्हणतात की जो पक्ष (विधानसभा निवडणुकीत) १४५ चा ‘मॅजिक फिगर’ गाठेल त्याचा मुख्यमंत्री होणे निश्चित असते. अजितदादा हे स्वकर्तुत्वाने भविष्यात हा आकडा गाठतील, असा विश्वास आमदार शिंगणे यांनी बोलून दाखविला.