बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासंदर्भात पक्ष सोडणार, कुणाला जाऊन मिळणार या बातम्या म्हणजे ‘मीडिया’ने रंगवलेले कपोलकल्पित चित्र आहे. दादांच्या मनात ‘असं काही’ असेल असे मला अजिबात वाटत नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे विदर्भातील प्रमुख नेते, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज मंगळवारी येथे निवडक माध्यमांशी बोलताना पवार गोटातील विश्वासू नेते म्हणून ओळख असणाऱ्या आमदार शिंगणे यांनी हा दावा केला. या चर्चेत त्यांनी कोणत्याही ‘चुकीच्या राजकीय चमत्काराची’ शक्यता पार फेटाळून लावली. विरोधी पक्षनेते अजित पवार एक तासही कुठे दिसले तर ते माध्यमांवर ‘नॉट रिचेबल’ अशी ब्रेकिंग झळकते. त्यामुळे सध्या माध्यमात झळकणाऱ्या बातम्या माध्यमांनीच रंगवलेले चित्र असल्याचे ते म्हणाले. आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे भाजपविरुद्ध देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे, त्यांची मोट बांधण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यांनी त्यादृष्टीने कामाला सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे असे असताना (राज्यात) ‘काही वेगळे’ होईल असे मला अजिबात वाटत नसल्याचे शिंगणे ठामपणे म्हणाले.

हेही वाचा >>> “भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे”, नाना पटोलेंची टीका म्हणाले, लोकशाही विरोधातील पक्ष…

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पुणे येथील बहुचर्चित ‘बॉम्बस्फोट’च्या विधानाबद्धल विचारले असता, त्याबद्धल मला काहीच माहीत नाही. ते विधान त्यांनी केले आहे, त्यामुळे त्यावर त्यांचीच प्रतिक्रिया घेणे योग्य राहील. त्यांच्या मनात काय व त्यांची माहिती काय हे मी कसं सांगणार, असा प्रतिप्रश्न आमदार शिंगणे यांनी उपस्थित केला.

हेही वाचा >>> गडचिरोली : २३ गुन्हे दाखल असलेल्या जहाल नक्षलवाद्यास अटक

अवकाळीने झालेले नुकसान, संकटग्रस्त शेतकरी याबद्धल विचारले असता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यासह लाखो शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका माजी पालकमंत्री शिंगणे यांनी केली. शिंदे सरकार सत्तेत येऊन नऊएक महिने झाले, या कालावधीत पालकमंत्री एकदा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्ताने जिल्ह्यात आले. दुसरी बैठक त्यांनी ‘ऑनलाईन’ घेतली. शेतकऱ्यांचे काय हाल चालले, हे बघायला त्यांना वेळ नाही. पालकमंत्र्यांचा (जळगाव) जिल्हा बुलढाण्याला लागून असतानाही त्यांची उदासीनता जिल्ह्यासाठी मारक ठरली आहे. अवकाळी, गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अमाप नुकसान झाले. पंचनामे झाले, अहवाल सादर झाला, सरकार म्हणते मदत पाठवली पण जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी मदतीपासून वंचितच असल्याचे शिंगणे चर्चेअंती म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar will leave the party impossible for claims rajendra shingane scm 61 ysh