गडचिरोली : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुलीने बंड केले.विविध खासगी संस्थांचे निवडणूक सर्वेक्षण आणि गोपनीय सरकारी यंत्रणेचा अहवाल विरोधात, तरी अजित पवारांचे शिलेदार धर्मरावबाबा आत्राम अहेरी विधानसभेतून १६ हजाराहून अधिक मताधिक्क्याने विजयी झाले. त्यांनी ही किमया कशी साधली याबद्दल दावे प्रतिदावे केल्या जात असले तरी यामागे आत्राम यांचे प्रभावी निवडणूक नियोजन आणि ५० वर्षाचा राजकीय अनुभव आहे. यामाध्यमातूनच त्यांनी विजयश्री खेचून आणली, अशी चर्चा आहे.

ग्रामपंचायत सदस्य ते राज्याचे कॅबिनेट मंत्री असा प्रवास करणारे अहेरी राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ सदस्य धर्मरावबाबा आत्राम यांच्या विजयाची सद्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यंदा त्यांच्यापुढे पुतण्या माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यासह मुलगी भाग्यश्री आत्राम(हलगेकर) असे तिहेरी आव्हान होते. आत्राम राजपरिवारातील तीन सदस्य एकमेकांविरोधात उभे राहण्याची देखील ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे यावेळी विजय मिळवणे सोपे नव्हते. मुलीने बंड केल्याने काही कार्यकर्ते त्यांना सोडून तिकडे गेले. पुतण्याने बंडखोरी केली. विविध संस्थानी केलेल्या सर्वेक्षणात त्यांच्याविरोधात अहवाल देण्यात आला. अशा परिस्थितीत खचून न जाता वयाच्या ७२ व्या वर्षी धर्मरावबाबांनी एकहाती खिंड लढवली. सोबत होता तो ५० वर्षाचा राजकीय अनुभव आणि योग्य नियोजन. निवडणूक काळात विधानसभेतील प्रत्येक गावात जाणारे ते एकमेव उमेदवार होते. त्यांनी लहान-मोठ्या जवळपास दोनशेहून अधिक सभा घेतल्या. सर्व जुन्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले आणि त्यांना जबाबदारी दिली आणि अनेकांना अशक्य वाटणारा विजय खेचून आणला. वडील विरुद्ध मुलगी अशी लढत असल्याने अहेरी विधासभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. हे विशेष.

हेही वाचा…राज्यात ग्राहकांचे वीज देयक झाले कमी… प्रधानमंत्री सूर्यघर योजना…

कंबरेला पट्टा बांधून प्रवास

क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहेरी विधानसभा क्षेत्र मोठे आहे. येथे एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जाण्यासाठी जवळपास १७० किमीचा प्रवास करावा लागतो. निवडणुकीत दुर्गम भाग, नक्षलवाद्यांची दहशतीचे आव्हान असते. अशा परिस्थितीत धर्मरावबाबा आत्राम यांनी कंबरेला पट्टा बांधून दोन महिने सतत प्रवास केला. काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. तुलनेने तरुण असलेले प्रतिस्पर्धी अम्ब्रीशराव आत्राम यांनी ही निवडणूक गंभीरतेने घेतलीच नाही. त्यांच्या लेटलतीफ कारभार विरोधकांनी निवडणुकीचा मुद्दा बनवला तरी त्यांची सवय मोडली नाही. याच कारणामुळे २०१९ आणि २०२४ सलग दोन वेळा दारुण पराभव स्वीकारावा लागला. यामुळे त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे.