लोकसत्ता टीम
नागपूर: शहरात सध्या कार्यकर्त्यांना आपला नेता मुख्यमंत्री म्हणून बघायची इच्छा जाहीर प्रगट करण्याची उबळ आली आहे. देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून संबोधणारे फलक मंगळवारी झळकले होते. त्यानंतर बुधवारी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे फलक लावले आहेत.
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी एका मुलाखती दरम्यान मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या शिक्षणाबाबत काँग्रेस आणि आप पेक्षा वेगळी भूमिका मांडली. ते भाजप मध्ये जातील अशीही अटकळ होती. या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका कार्यकर्त्यांने फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावले होते. आज राष्ट्रवादीचे प्रशांत पवार यांनीही अजित पवार हेच पुढील मुख्यमंत्री असल्याचे फलक लावले.
आणखी वाचा- मुख्यमंत्री संपावर गेले की सुट्टीवर? नाना पटोले यांची टीका; म्हणाले, “राज्याचे तीन तेरा…”
आता या फलकांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. पुढे हे फलक युद्ध वाढत जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे प्रशांत पवार यांनी लावलेल्या या फलकावर अजीत पवार यांचे छायाचित्र नाही. फलक लावणाऱ्याचे छायाचित्र मोठे आणि त्या खालोखाल शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि अनिल देशमुख यांचे छायाचित्र आहे.