नागपूर : बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांचा भाचा आकाश आनंद यांची नागपूरसह महाराष्ट्रात चार सभा होणार आहेत. नागपुरात येत्या १७ नोव्हेंबरला सुरेश भट सभागृहात सभा आयोजित करण्यात आली आहे.
आकाश आनंद यांच्या सभेच्या पूर्वतयारीसाठी आंबेडकर सांस्कृतिक भवन उर्वेला कॉलनी येथे मंगळवारी विदर्भातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. गेल्यावर्षी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी आकाश आनंद प्रथमच मुंबईत आले होते. आता ते पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. ते नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबई येथे सभा घेणार आहेत. मायावती यांचे उत्तराधिकारी म्हणून आकाश आनंद यांच्याकडे बघितले जात असून त्यांच्या या दौऱ्याने बसपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.
विदर्भातील प्रत्येक फुले-शाहू-आंबेडकरी कार्यकर्त्याने संविधान वाचवण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन बसपा महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी व विदर्भ प्रदेशचे प्रभारी ॲड. सुनील डोंगरे यांनी केले. विदर्भातून पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा दावा बसपाचे राष्ट्रीय समन्वयक नितीन सिंग यांनी केला.
हेही वाचा – ब्रिटिशकालीन जलवाहिन्यांची गुंतागुंत! नागपूर रेल्वेस्थानक पुनर्विकास प्रकल्पाला विलंब
१७ नोव्हेंबरला नागपुरात, २३ ला पुणे येथे, २९ ला औरंगाबाद व ६ डिसेंबरला मुंबई येथे सभा होईल. यानंतर दिसेबरमध्ये बसपा प्रमुख मायावती महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत अहेत, असे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांनी सांगितले.