वर्धा : सध्या सौर ऊर्जेचा उपयोग करण्याकडे मोठा कल दिसून येतो. घरगुतीच नव्हे तर खाजगी उद्योग, मोठे कारखानदार या ऊर्जेवर मदार ठेवू लागले आहे. हे सोलर पॅनल लावून देणाऱ्या अनेक कंपन्या पण वाढत आहे. त्यात जोखमीचे काम करणारी मुलं साधारण कुटुंबातील व प्रशिक्षण नसणारीच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे धोका कसा उदभवतो, याचे प्रत्यन्तर या घटनेत आले आहे.

सेलू तालुक्यातील जुवाडी येथे एका जिनिंग प्रेसिंग संस्थेत सोलर पॅनल लावण्याचे ठरले. मोठे युनिट असल्याने नागपूरच्या जेसीस ग्रीन एनर्जी कंपनीस काम देण्यात आले. या कामावर गरजू १८ युवकांना बोलवण्यात आले. त्यात अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरलगत असलेल्या गणेशपूर या गावचा आकाश संजय निंबाळकर हा पण २८ वर्षीय युवक होता. तीस फूट उंचीवरील छतावर तो व त्याचे सहकारी भारी वजनाचे सोलर पॅनल घेऊन चढत होते. पण वजन सांभाळता नं आल्याने तोल गेला व आकाश खाली कोसळला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्याने चांगलाच कल्लोळ झाला. मृत आकाशच्या घरची मंडळी पोहचली. एकुलता एक मुलगा मरण पावल्याने त्यांनी आक्रोश केला. पुढे काय, हा प्रश्न होता. कंपनी काहीच जबाबदारी घेण्यास तयार नव्हती. वडिलांना ५० हजार रुपये घ्या व गप्प बसा म्हणून दरडावण्यात आले.

पण हे प्रकरण सोपे नसल्याने त्याची चर्चा उसळली. संभाजी ब्रिगेडचे तुषार उमाळे यांना माहित होताच ते पोहचले. कंपनीस जाब विचारला. पोरं कामास ठेवता पण त्यांची जबाबदारी मात्र घेत नाही. एवढ्या जोखमीचे व उंचावर चढण्याचे काम देता पण साधे हेल्मेट देत नाही. मदतीस दोरखंड नसतो. पडला तर खाली जाळी नाही. मग मृत्यूस जबाबदार कोण, असा सवाल करण्यात आला. पण कंपनी अधिकारी दाद देत नव्हते. पण कंपनी मदत देण्याची भूमिका घेत नाही तोपर्यंत मृतदेहाचे शव विच्छेदन होणार नाही, असा निर्णयाक पवित्रा उमाळे यांनी घेतला. तरीही कंपनी अधिकारी रक्कम वाढवीत नव्हते. शेवटी आज दुपारी कंपनीने मृताच्या नातेवाईकास १२ लाख रुपये देण्याचे मान्य केले. आणि सायंकाळी आता शव विच्छेदन प्रक्रिया सूरू झाली आहे. तर दुसऱ्या बाजूस उमाळे व सहकारी कंपनीकडून १२ लाख रुपयाचा चेक घेतांना नेमके कश्यासाठी हा चेक ते स्टॅम्प पेपरवर लिहून घेत आहे. तसेच चेक वठण्याची पण जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. बेरोजगार मुलांना दावणीस बांधून घेणाऱ्या कंपन्यांनी सर्व ती जबाबदारी घेणे अपेक्षित असल्याचे तुषार उमाळे म्हणाले.

Story img Loader